योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या हत्या प्रकरणात मोठी माहिती समोर आलेली आहे. सतीश वाघ यांच्या हत्येची सुपारी ही त्यांच्याच पत्नीने दिली असल्याची माहिती समोर आली आहे.
नेमकं प्रकरण काय?
फुरसुंगी फाटा परिसरात असलेल्या ब्लूबेरी हॉटेलच्या समोरून सकाळी साडेसहाच्या सुमारास सतीश वाघ यांचं अपहरण झालं. ही घटना त्यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीने पाहिली. सातच्या सुमारास वाघ यांच्या कुटुंबीयांना या घटनेची माहिती मिळाली. साडेसात वाजता हडपसर पोलिसांना कळविण्यात आलं. साडेआठ वाजता गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला. साडेनऊ वाजता पोलिसांची 12 पथक प्रत्यक्ष तपासासाठी रवाना झाली. बारा वाजल्यापासून सीसीटीव्ही आणि फोनच्या लोकेशन वरून तपास सुरू केला गेला. तीन वाजता पुण्याचा आयुक्तांनी स्वतः हडपसर पोलीस ठाण्यात जाऊन संपूर्ण तपासाचा आढावा घेतला. आणि तपास सुरू असतानाच साडेपाच ते सहाच्या दरम्यान शिंदवणे घाटात वाघ यांचा मृतदेह सापडला.
शिंदवणे घाटाच्या परिसरात काही मुलं फिरत असताना त्यांना हा बेवारस मृतदेह आढळला. याची माहिती पोलिसांना देण्यात आली. आठ वाजता घटनास्थळावर फॉरेन्सिक टीम आणि डॉग स्कॉड पोहोचले. त्यानंतर मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आला. व पोलिसांच्या पथकांकडून मारेकऱ्यांचा शोध सुरू झाला.
सतीश वाघ यांचं अपहरण केल्यानंतर अपहरणकर्त्यांनी खंडणीसाठी कोणताही फोन केला नाही. याचाच अर्थ अपहरण हे खंडणीसाठी करण्यात आलं नव्हतं. त्याचबरोबर अपहरण झाल्याच्या काही वेळातच त्यांचा खून झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. याचाच अर्थ अपहरण हे थेट खून करण्यासाठीच करण्यात आलं होतं. त्यामुळे वाघ यांच्या खुनामागचं नेमकं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही. पूर्ववैमनस्यातून किंवा आर्थिक वादातून खून झाला आहे का या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे. मात्र या घटनेने पुन्हा एकदा पुणे पोलीस आणि राज्य सरकार करतंय तरी काय हा प्रश्न उपस्थित होत आहेत.