Vasant More

विशेष लेख! गड्या, आपली पालिकाच बरी! वसंत मोरेंकडून पालिकेची तयारी!

77 0

 

लोकसभेला लढायचंच असा चंग बांधत ‘वंचित’कडून उमेदवारी मिळवून निवडणूक लढवली पण वाट्याला निराशा आली. मग विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ‘वंचित’ सोडून मातोश्रीची वाट धरली, हडपसर, खडकवासल्यातून उमेदवारीसाठी वाट पाहिली पण पुन्हा एकदा निराशाच हाती लागली. सगळे प्रयत्न करून झाल्यानंतर आता वसंत मोरे म्हणतायत,’गड्या, आपली पालिकाच बरी!

लोकसभा गेली, विधानसभा गेली, आता उरली…
सर्वांत आधी शिवसैनिक मग मनसैनिक, मग भीमसैनिक आणि आता पुन्हा शिवसैनिक हा वसंत मोरे यांचा आजवरचा राजकीय प्रवास… आधी शिवसेना आणि मग मनसेला ‘जय महाराष्ट्र’ केला. त्यानंतर ‘वंचित’ला ‘जय भीम ‘करत ‘मशाल’ हाती घेतली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षात प्रवेश करताच वसंत मोरे हडपसरमधून लढणार अशी चर्चा सुरू झाली. त्यानंतर त्यांच्याच फेसबुक पेजवर ‘खडकवासला जिंकायचा असेल तर सिंहगड न थांबता सर करावाच लागेल,’ अशी पोस्ट पडली आणि वसंत मोरे हडपसरमधून नव्हे तर खडकवासल्यातून लढणार, अशी चर्चा रंगली. पुढं निवडणुकीचं बिगुल वाजलं, तारीख ठरली आणि हडपसर, खडकवासल्यातून आघाडीतर्फे कोणत्या पक्षाकडून कोण लढणार याची यादी बाहेर पडली. मात्र ठाकरे गटाच्या यादीत ना हडपसर होतं ना खडकवासला! अखेर ठाकरे गटाकडून वसंत मोरे निवडणूक लढणार असल्याची चर्चा केवळ चर्चाच बनून राहिली. हडपसरमधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं उमेदवार जाहीर केल्यानं आघाडीच्या जागावाटपात ही जागा राष्ट्रवादीला सुटल्याचं स्पष्ट झालं तर खडकवासल्यातूनही शरद पवारांच्या राष्ट्रवादीचाच उमेदवार लढणार याला बळकटी मिळाली. आघाडीत या दोन्ही जागा राष्ट्रवादीला सुटल्यानं वसंत मोरे विधानसभा लढणार नाहीत हे स्पष्ट झालं. ‘जेव्हा बाहेर धुरळा उडत असतो ना तेव्हा आपण शांत, एकाग्रतेनं नुसतं परिस्थितीवर लक्ष ठेवायचं, अजिबात विचलित व्हायचं नाही,’ ही त्यांची फेसबुक पोस्ट बरंच काही सांगून गेली.

‘मनसे’तली 18 वर्षे, ‘वंचित’चे 60 दिवस!

2007, 2012 आणि 2017 असे सलग तीनवेळा नगरसेवक, विरोधी पक्षनेते, गटनेते आणि मग शहरप्रमुख राहिलेल्या वसंत मोरेंनी तब्बल 18 वर्षांनी ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मनसेला ‘जय महाराष्ट्र’ केला. 2024 ची निवडणूक लढवायचीच या उद्देशानं झपाटलेल्या वसंत मोरेंनी आधी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडं नंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनेकडं तिकीट मागून पाहिलं पण दोन्ही पक्षांकडून नकार आल्यानंतर त्यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेऊन थेट ‘वंचित’मध्ये प्रवेश केला आणि लोकसभेची उमेदवारी मिळवली. मात्र, भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसच्या रवींद्र धंगेकरांसमोर वसंत मोरेंचा काही निभाव लागला नाही. ‘पुण्याची पसंत मोरे वसंत’ हा प्रचार या दोन तगड्या उमेदवारांसमोर काही चालला नाही. मोरेंना अवघी 32012 इतकीच मतं मिळाली. अखेर मोरेंनी ‘वंचित’मध्ये कसेबसे 60 दिवस काढले आणि प्रकाश आंबेडकरांना
‘जय भीम’ म्हणत उद्धव ठाकरेंची ‘मातोश्री’ गाठली.

‘जहाल’ तात्या झाले ‘मवाळ’!
दरम्यानच्या काळात वसंत मोरेंनी दोनवेळा विधानसभेला उभं राहूनही आपलं नशीब आजमावलं. 2009 आणि 2019 मध्ये त्यांनी हडपसर मतदारसंघातून मनसेकडून निवडणूक लढवली पण दोन्ही वेळेस त्यांचा पराभव झाला. “आता पक्षाचा जो आदेश असेल त्यानुसार महाविकास आघाडीचं काम करावं लागेल. मी इच्छुक होतो पण पक्षाला जागा मिळाली नाही त्याला मी तरी काय करणार?,” असं म्हणत त्यांनी आपली हतबलता व्यक्त केली. ‘मला पक्षानं दिलेली राज्य संघटकपदाची जबाबदारी पार पाडणं हेच माझं काम! काही महिन्यांनी महापालिका निवडणुका आहेत. दक्षिण पुण्यातील कात्रज, धनकवडी, बालाजीनगर हा माझा प्रभाग आहेच की,’ हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

एकूणच काय तर एकेकाळी ‘जहाल’ असलेले वसंत मोरे आता ‘मवाळ’ झाल्याचे दिसले आणि ‘गड्या, आपली पालिकाच बरी,’ असा पवित्रा घेत पालिकेच्या तयारीला लागले!

संदीप चव्हाण, वृत्तसंपादक ‘TOP NEWS मराठी’

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!