Breaking News

बहिणीला पळवून नेण्याची धमकी देणाऱ्या तरुणाचा भर वस्तीत खून; पुण्यातील दांडेकर पूल परिसरातील गंभीर घटना

377 0

बहिणीला पळवून नेण्याची धमकी देणाऱ्या तरुणाचा मारहाण करत भावाने व त्याच्या मित्रांनी खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना पुण्यातील दांडेकर पूल परिसरात 14 ऑक्टोबर रोजी साडेसहा ते साडेसात वाजण्याच्या दरम्यान घडली.

कौस्तुभ जयदीप नाईक (वय 29, रा. सदाशिव पेठ, नातूबाग मंडळाच्या मागे) असे हत्या झालेल्याचे तरुणाचे नाव असून याबाबत पंकज बाळू नांगरे (वय 31, रा. जुनी देसाई वीट भट्टीजवळ, दांडेकर पूल) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत कौस्तुभ याचे मुख्य आरोपीच्या बहिणीशी प्रेम संबंध होते. त्याने आपण या मुलीला पळवून नेणार असल्याची धमकी दिली होती. त्यामुळे या मुलीचा भाऊ संतापला. आणि 3 ते 4 जणांच्या टोळक्याने कौस्तुभचा खून केला.

या आरोपींनी आधी कौस्तुभला फोन करून दांडेकर पूल परिसरात बोलावून घेतलं. त्यानंतर भर वस्तीत कौस्तुभला लाकडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी स्थानिक नागरिक भयभीत झाल्याने कुणीही मदतीला आलं नाही. त्यानंतर रक्तबंबाळ झालेल्या कौस्तुभला घेऊन हे आरोपी सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या वरच्या मजल्यावर गेले. तिथे त्याला आणखी मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला तिथेच टाकून देऊन हे आरोपी पसार झाले. कौस्तुभला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, या प्रकरणी कुणाल धर्माधिकारी, चेतन भालेराव, आणि अतिश पायाळ (सर्व रा. जय महाराष्ट्र मित्र मंडळ, दांडेकर पूल) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून फरार असलेल्या या आरोपींना पोलिसांनी अवघ्या काही तासात अटक केली. या आरोपींना न्यायालयाने 22 ऑक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर या गुन्ह्यातील कुणाल धर्माधिकारी आणि चेतन भालेराव हे दोन्ही सराईत गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळेच अशा सराईत गुन्हेगारांना रोखण्याचं‌ मोठं आव्हान पोलिसांसमोर आहे

Share This News
error: Content is protected !!