जगा सांगे ब्रह्मज्ञान…’ सोशल मीडियावर प्रसिद्ध असलेले कीर्तनकार चैतन्य महाराज यांना अटक नेमकं प्रकरण काय ?

298 0

सोशल मीडियावर दुसऱ्यांना उपदेश देऊन प्रसिद्धी मिळवलेले तरुण कीर्तनकार चैतन्य वाडेकर महाराज यांचा एक प्रताप समोर आला आहे. ज्यासाठी त्यांना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. ही बातमी ऐकून चैतन्य वाडेकर यांच्या अनुयायांना चांगलाच धक्का बसलाय. मात्र ही अटक नेमकी कशासाठी करण्यात आली ? चैतन्य महाराज यांनी असं केलंय तरी काय ? पाहूया सविस्तर…

चैतन्य वाडेकर चाकण एमआयडीसी हद्दीत वास्तव्यास आहेत. त्यांचे एका बिल्डर सोबत जमिनीवरून वाद सुरू आहेत. वाडेकर यांच्या घराजवळच्या जागेत बिल्डरने कंपनी उभारली आहे. बिल्डरने आपली जागा हडपली असून त्याच जागेतून खाजगी रस्ता केल्याचा आणि कंपाऊंड टाकल्याचा आरोप चैतन्य वाडेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केला. ही जागा नेमकी कोणाची याचा छडा लावण्यासाठी जमिनीची सरकारी मोजणी करण्याची मागणी वाडेकरांनी केली होती ज्याला न्यायालयाने मान्यता दिली. मात्र ही मोजणी करण्याच्या आधी केवळ न्यायालयाच्या निकालामुळे चैतन्य वाडेकर यांचा अति आत्मविश्वास बळावला आणि त्यांनी रात्रीतच जेसीबी मागून आपल्या तीन भावांसह बिल्डरने बांधलेला खाजगी रस्ता उकडून टाकला तर कंपाउंड ही तोडलं. त्यानंतर म्हाळुंगे पोलिसांनी याची दखल घेतली मात्र चैतन्य महाराज वाडेकर यांनी चक्क पोलिसांनाच उपदेशाचे डोस दिले. आपण सोशल मीडियावर कसे प्रसिद्ध आहोत आणि आपलंच म्हणणं कसं बरोबर आहे हे पटवून द्यायचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना कायद्याचा धाक दाखवताच महाराजांना आपली चूक लक्षात आली.

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण व्हायच्या आधीच रस्ता आणि कंपाउंड तोडण्याचा पराक्रम केल्यानंतर आता अखेर चैतन्य वाडेकर यांच्यासह त्यांच्या भावांना आणि इतर साथीदारांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. मात्र यामुळे सोशल मीडियावर इतरांना संयम, श्रद्धा, शांती आणि सुखाचे उपदेश देणारे महाराज खाजगी आयुष्यात मात्र असं काही करू शकतात यावर त्यांच्या अनुयायांनाही विश्वास बसत नाहीये.

Share This News
error: Content is protected !!