पीएमआरडीएने रस्ता दुरुस्तीसंदर्भात पुन्हा बजावली पीआयटीसीएमआरएलला नोटीस;वर्दळीच्या रस्त्याचे तातडीने काम करण्याचे महानगर आयुक्तांचे निर्देश 

111 0

पुणे / पिंपरी (दि.२१) : गत काही दिवसात गणेशखिंड, पाषाण आणि बाणेर रस्त्यासह आदी भागातील महत्त्वाच्या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. परिणामी वाहनधारकांसह नागरिकांना अडचणी येत असल्याने पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (पीएमआरडीए) महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी या बांधा वापरा हस्तांतरीत करा, या तत्वावर राबविण्यात येणाऱ्या सवलतकार यांना नोटीस बजावली आहे. यात सवलतकार पुणे आयटीसीटी मेट्रो रेल लिमिटेडच्या (पीआयटीसीएमआरएल) मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तातडीने कामे पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.

पुणे आयटीसीटी मेट्रो रेल लिमिटेडकडे संबंधित भागातील रस्त्याची बांधा वापरा हस्तांतरीत करा या तत्वावर करारानुसार जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र काही दिवसापासून गणेश खिंड, पाषाण, बाणेरसह कृषी महाविद्यालयाच्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. संबंधित रस्ते कायम वर्दळीचे असल्यामुळे या रस्त्यावरून शेकडो दुचाकी वाहनांची वर्दळ असते. खराब रस्त्यामुळे वाहनधारकांना अतिशय हळुवारपणे खड्डे चुकवत त्यातून मार्ग काढावा लागत आहे. या रस्त्यांची संबंधित यंत्रणेने करारानुसार अपेक्षितरित्या दुरुस्ती करणे गरजेचे आहे. मात्र वारंवार सांगून देखील पीआयटीसीएमआरएल याकडे दुर्लक्ष करत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे नागरिकांसह वाहनधारकांच्या अडचणी लक्षात घेऊन पीएमआरडीएचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी पुणे आयटीसीटी मेट्रो रेल लिमिटेड यांना शुक्रवारी नोटीस बजावली. यात खराब रस्त्यांची तातडीने २५ सप्टेंबरपर्यंत दुरुस्ती करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. माण- हिंजवडी ते श‍िवाजीनगर या भागातील रस्त्यासंदर्भात देखील गत १५ दिवसांपूर्वी संबंधितांना नोटीस बजावण्यात आली होती.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!