60- 65 वर्षांच्या व्यक्तीला चक्क 25 वर्षाच्या व्यक्तीसारखं तरुण बनवणार तंत्रज्ञान आपल्याकडे असल्याचं सांगत एकाने शेकडो लोकांची फसवणूक करून तब्बल 35 कोटी रुपये लाटण्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना कानपूर मध्ये घडली आहे.
इस्रायलमध्ये व्यक्तीचं वय घटवण्याचं आधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून त्याद्वारे 60-65 वर्षांचा व्यक्ति देखील 25 वर्षांचा तरुण होऊ शकतो. असं सांगून फसवणूक करणाऱ्या या दांपत्याने कानपूरच्या उच्चभ्रू भागात ऑफिस थाटलं. श्रीमंत व्यक्तींना शिकार करून वय घटवण्याचा विश्वास दिला. व इस्रायली तंत्रज्ञान वापरण्यात येणार असल्याचे सांगून लाखो रुपये उकळले.
राजीव कुमार दुबे व रश्मी राजीव दुबे अशी या तोतयांची नावं आहेत. या दोघांनी रेनू सिंह चंदेल नावाच्या व्यक्तीबरोबर पार्टनरशिप मध्ये व्यवसाय सुरू केला होता. चंदेल यांनीच आता या दांपत्यावर गंभीर आरोप केले आहेत. ऑक्सिजन थेरपीद्वारे 65 वर्षांच्या व्यक्तीला 25 वर्षांचे बनविण्याची जाहिरात त्यांनी केली. 25 वर्षांचे बनविण्यासाठी सहा हजारात दहा वेळा तर 90 हजारात तब्बल दोन महिने ट्रीटमेंट दिली जाईल, असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं. त्यांच्या या भूलथापांना लोक भुलले आणि लाखो रुपये खर्च केले.
तेवढेच नाही तर पार्टनर चंदेल याच्याकडून दहा लाख 75 हजार रुपये घेऊन ते परत न देता हे दांपत्य गायब झालं. त्यामुळेच या दोघां विरोधात चंदेल यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. फिर्यादीत सांगितल्यानुसार दुबे पती-पत्नीने शेकडो लोकांकडून वय घटवण्याच्या ट्रीटमेंटच्या नावाखाली 35 कोटी रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.