पुण्यातून दररोज गुन्हेगारांनी माजवलेल्या दहशतीची नवनवीन प्रकरणं समोर येत आहेत. आजही अशीच एक धक्कादायक घटना समोर आली असून केवळ एकमेकांकडे पाहण्यावरून तरुणांच्या डोक्यात लोखंडी हत्याराने वार केले आहेत. या हल्ल्यात संबंधित तरुण गंभीर जखमी झाला आहे.
ही घटना अरण्येश्वर समाज मंदिरासमोर 6 सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव सोमनाथ कालिदास पवार (वय-२१, रा. अण्णाभाऊ साठे वसाहत, अरण्येश्वर) असे असून त्याने सहकारनगर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे, फिर्यादी तरुण अरणेश्वर परिसरात वास्तव्यास आहे. तो आपल्या घराजवळ असलेल्या अरणेश्वर समाज मंदिर परिसरात बसला होता. त्यावेळी आरोपी हा समोरून जात असताना फिर्यादींनी त्यांच्याकडे पाहिले. त्यावर ‘माझ्याकडे का पाहतो’ असं म्हणत आरोपींनी फिर्यादी तरुणाला शिवीगाळ करत मारहाण केली. हे वाद इतके वाढले की आरोपीने थेट लोखंडी हत्याराने फिर्यादी तरुणाच्या डोक्यात वार केले. यात हा तरुण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
तर या प्रकरणी सहकारनगर पोलिसांनी साईनाथ लोंढे (वय-२१, रा. अण्णाभाऊ साठे वसाहत, अरण्येश्वर) याच्यासह त्याच्या साथीदारांविरोधात विरोधात गुन्हा दाखल केला आहे.