उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जितके चर्चेत असतात तितक्याच त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यादेखील चर्चेत असतात. अमृता फडणवीस या एक गायिका असून त्यांची नवनवीन गाणी रसिकांचं मनोरंजन करतात. मात्र यावेळेस त्या कोणत्याही गाण्यामुळे नाही तर त्यांच्या एका विधानामुळे चर्चेत आल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांना ‘रोमँटिक होता येत नाही, त्यांना रोमान्स जमत नाही’, असं वक्तव्य त्यांनी केल्यामुळे त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.
अमृता फडणवीस या एका मनोरंजनात्मक कार्यक्रमात पाहुण्या म्हणून गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या बद्दल काही प्रश्न विचारण्यात आले. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हि या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करते. सोनालीने धरण उशाला आणि कोरड घशाला ही म्हण ऐकल्यावर तुम्हाला काय आठवतं असं विचारल्यावर उत्तर देताना ‘धरण उशाला कोरड घशाला, असं म्हटल्यावर माझ्यासमोर देवेंद्र फडणवीस येतात, ते रोज येतात, जातात, दिसतात… पण त्यांना पकडून त्यांचा हात धरुन मजा मस्ती करताच येत नाही.’ असं अमृता फडणवीस म्हणाल्या. त्यानंतर त्यांना देवेंद्र फडणवीस रोमँटिक आहेत का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर अमृता फडणवीस म्हणाल्या, ‘नाही, देवेंद्र फडणवीस रोमँटिक नाहीत. कधीच रोमँटिक नव्हते. लग्नाच्या आधीही नाही आणि नंतरही नाही, त्यांना रोमान्स जमतही नाही. देवेंद्रजी प्रॅक्टीकल आहेत मी रोमँटिक आहे, त्यांना फक्त राजकारण कळतं. बाकी काही कळत नाही’ त्यांचं हे उत्तर ऐकून उपस्थितांमध्ये हशा पिकला. तर त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.