राज्यातील राजकीय वातावरण गेल्या अनेक दिवसांपासून तापलेले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून एकमेकांवर टीका, आरोप आणि विविध दावे केले जात आहेत. यातच आता राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांनी एक मोठा फोटो बॉम्ब टाकला आहे. ज्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
अनिल देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. ‘देवेंद्र फडणवीस यांचा एक माणूस माझ्याकडे एक प्रतिज्ञापत्र घेऊन आला होता. पण मी त्यावर सही केली नाही’, असा आरोप त्यांनी केला होता. त्याचबरोबर आपल्याकडे एक पेन ड्राईव्ह आहे ज्यात अनेक गोष्टींचे पुरावे आहेत अशा आशयाचे वक्तव्य देखील त्यांनी केले होते. त्यावरच आज त्यांनी एक फोटो माध्यमांसमोर दाखवला.
अनिल देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये एक फोटो दाखवत देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. या फोटोत फडणवीस आणि समित कदम हे एकत्र दिसून येत आहेत. त्यावर बोलताना देशमुख म्हणाले, ‘समित कदम आणि देवेंद्र फडणवीस यांचे जवळचे संबंध आहेत. समित कदम पाच-सहा वेळा प्रतिज्ञापत्र घेऊन माझ्याकडे आला होता. मी जर त्यावर सही केली असतील तर आज उद्धव ठाकरे आणि अदित्य ठाकरे खोट्या आरोपाखाली जेलमध्ये असते. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना फसवण्याचा प्रयत्न केला गेला. पण मी त्यावर सही केलीच नाही. माझ्याबरोबर चा प्रयोग अयशस्वी झाला. पण अजित पवारांवरचा प्रयोग यशस्वी झाला. या सगळ्यासाठी माझ्यावर खूप दबाव आणला गेला, ज्यांनी ऐकलं नाही ते जेलमध्ये गेले.’
देवेंद्र फडणवीस यांच्यावर अनिल देशमुख यांनी अतिशय गंभीर आरोप केले आहेत त्याचबरोबर फडणवीस यांच्याबरोबर ज्या समिती कदम चा फोटो आहे, तो साधा नगरसेवकही नाही मग त्याला वाय दर्जाची सुरक्षा का दिली?, असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान देशमुखांच्या या फोटो बॉम्बमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.