झोपलेल्या पत्नीला कुऱ्हाडीने ठार करून ‘तो’ निवांत झोपी गेला; पुण्यातील लोणीकंदमध्ये खळबळजनक घटना
विद्येचे माहेरघर असलेले पुणे शहर सध्या गुन्हेगारीचे माहेरघर झाले आहे. शहरात रोज तोडफोड, हाणामारी, खुनाचा प्रयत्न आणि हत्येच्या घटना समोर येत आहेत. अशीच एक धक्कादायक घटना पुण्यातील लोणीकंद येथील बुर्केगाव परिसरात घडली आहे. गाढ झोपेत असलेल्या पत्नीला कुऱ्हाडीचे घाव घालून ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लक्ष्मीबाई बाबा जाधवराव (वय-४५, बुर्केगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी बाबा जाधवराव याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत लक्ष्मीबाई या एका खाजगी कंपनीत नोकरी करत होत्या. तर आरोपी हा वेल्डिंगची कामे करतो. आरोपीला दारू पिण्याचे व्यसन असल्याने तो सतत दारू पिऊन घरी यायचा. ज्यामुळे पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते. गुन्हा घडलेल्या दिवशी देखील असाच प्रकार घडला. मध्यरात्रीच्या सुमारास आरोपी पती हा दारू पिऊन घरी आला होता. त्यावेळी पत्नी बरोबर त्याचे वाद झाले. त्यानंतर काही वेळाने लक्ष्मीबाई झोपी गेल्या. वादाचा राग डोक्यात असलेला पती मात्र झोपला नाही. पत्नी गाढ झोपेत असल्याचे पाहून त्याने पत्नीवर कुऱ्हाडीने घाव घालून तिचा खून केला व स्वतः मृतदेहाच्या बाजूला झोपला.
दुसऱ्या दिवशी सकाळी लक्ष्मीबाई या कामावर गेल्या नाहीत. तसेच त्यांची मुलगी त्यांना फोन करत होती मात्र आईने फोन उचलला नाही म्हणून काळजीपोटी ती घरी आली. त्यावेळी घराचा दरवाजा बंद होता. अनेकदा दरवाजा ठोठावूनही दारणा घडल्यामुळे दार तोडून ती आत गेली. त्यावेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आई आणि निवांत झोपलेले वडील तिला दिसले. तिने तात्काळ या घटनेची माहिती लोणीकंद पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. या आरोपीला ही पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.