राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस असून अजित पवार यांना सर्व क्षेत्रातून वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी खास शैलीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर पारनेरचे तत्कालीन आमदार आणि नगरचे विद्यमान खासदार निलेश लंके अजित पवारांसोबत होते मात्र लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांची साथ सोडत निलेश लंके हे शरद पवारांसोबत आले आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून निलेश लंके यांनी लोकसभेची निवडणूक लढवत सुजय विखे-पाटील यांचा पराभव केला. लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निलेश लंके यांच्यावर टीका केली होती.
त्यानंतर आता वाढदिवसाच्या निमित्ताने निलेश लंके यांनी अजित पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना माझ्यावर नितांत प्रेम करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा आपणांस वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा असं ट्विट केला आहे पुढं निलेश लंके यांनी याच ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की आपणांस उत्तम आरोग्य व निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच माता वैष्णोदेवी चरणी प्रार्थना!