पुण्यातील गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. पोलीस प्रशासनाकडून अनेक उपाययोजना, कठोर नियम करूनही पुण्यात गुन्हे वाढत आहेत. विशेष म्हणजे यामध्ये अल्पवयीन गुन्हेगारांची संख्या ही जास्त असल्याचे आढळून येत आहे. अशीच एक घटना पुण्यातील भोसरी परिसरामध्ये घडली. भोसरीतील पाच अल्पवयीन मुलांनी मिळून एका तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
किरण बाळू लेनगर (वय 27, रा. शांतीनगर, भोसरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण हे भोसरीतील शांतीनगर भागात राहतात. ते आपल्या घराजवळून जात असताना त्यांचा चुकून एका अल्पवयीन मुलाला धक्का लागला. या मुलाने त्यावेळी मध्य प्राशन केले असल्यामुळे तो नशेत होता. त्यामुळे त्याने किरण यांचे म्हणणे ऐकून न घेता त्यांच्याशी वाद घातले. आणि पुढच्या काहीच वेळात या अल्पवयीन मुलाने त्याच्या आणखी चार मित्रांना बोलावून घेतले. या पाच जणांनी मिळून किरण यांना लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. त्यांच्या डोक्यात अनेकदा दांडकं मारलं, ज्यामुळे किरण यांना रक्तस्त्राव होऊ लागला आणि काही क्षणात ते रक्ताच्या थारोळ्यात पडले. किरण यांना त्याच अवस्थेत सोडून आरोपींनी पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. पोलिसांनी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भोसरी पोलीस करत आहेत. मात्र धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून थेट हत्या करण्यापर्यंत अल्पवयीन मुलांची मजल जात आहे. यावरूनच पुण्यात वाढलेली गुन्हेगारी लक्षात येते आणि या अल्पवयीन मुलांना पोलिसांचा धाक आहे की नाही असा प्रश्न निर्माण होत आहे.