पुण्यातील बालेवाडीत भारतीय जनता पक्षाचे आज म्हणजेच 21 जुलै रोजी महा अधिवेशन सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत बॅकफूटवर गेलेल्या महायुतीला विधानसभा निवडणुकीत पुन्हा फटका बसू नये, यासाठी हे महाअधिवेशन आयोजित करण्यात आले. विधानसभा निवडणुकीची या स्ट्रॅटेजी अधिवेशनात आखली जाणार आहे. मात्र याचवेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करतानाचा एक व्हिडिओ पोस्ट करत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी महा अधिवेशनात केलेल्या भाषणातील 52 सेकंदांचा व्हिडिओ रोहित पवार यांनी पोस्ट केला. ज्या व्हिडिओत सरकारने आणलेल्या योजना वारंवार जनतेला सांगायला हव्यात. सर्व नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी दररोज या योजना लोकांना सांगाव्यात. अगदी लग्नात गेलात तरी योजना लोकांपर्यंत पोहोचवा, कारण लोकांची मेमरी शॉर्ट टर्म असते. काल काय बोललो हे लोकांना आज लक्षात राहत नाही, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले. त्यावर आपली प्रतिक्रिया देत रोहित पवार आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, ‘मा. फडणवीस साहेब, “पब्लिकची मेमरी अत्यंत शॉर्ट असते, कारण आपण काल काय बोललो, हे आज लोकांना लक्षात राहत नाही,” हे आपलं वक्तव्य म्हणजे अहंकाराचा कळस आहे. महाराष्ट्राच्या जनतेला अशा प्रकारे शॉर्ट मेमरी म्हणणे महाराष्ट्र खपवून घेणार नाही.
एखाद्या योजनेचे १५०० रु दिले म्हणजे तुमच्या सरकारने केलेली पापं, भ्रष्टाचाराचे कारनामे, सत्तेची मस्ती, महाराष्ट्राच्या अस्मितेचे तोडलेले लचके आणि त्यातून महाराष्ट्राला झालेला मनस्ताप महाराष्ट्राचा शेतकरी, युवा, महाराष्ट्राची जनता विसरेल, असा तुमचा समज असेल तर मग महाराष्ट्र तुम्हाला अजून कळलेलाच दिसत नाही. निवडणुकीच्या तोंडावर योजना का आणल्या? हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेला माहीत आहे. हा महाराष्ट्र आहे, मध्यप्रदेश नाही. त्यामुळे तुमच्या पापाचा घडा हा स्वाभिमानी महाराष्ट्र फोडल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा.’
दरम्यान भाजपाच्या महा अधिवेशनात अनेक नेत्यांनी केलेल्या विधानांवर महाविकास आघाडीतील नेते आपल्या प्रतिक्रिया, टीका टिपण्या करताना दिसून येत आहेत. अशीच टीका रोहित पवार यांनी देखील केली आहे. रोहित पवारांची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.