महत्वाची बातमी, किरीट सोमय्या यांच्यानंतर नील सोमय्या यांना हायकोर्टाचा दिलासा

548 0

मुंबई- किरीट सोमय्या यांच्याप्रमाणेच त्यांचे पुत्र नील सोमय्या यांना देखील हायकोर्टाने दिलासा दिला आहे. आयएनएस विक्रांत निधी कथित घोटाळाप्रकरणी तूर्तास कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. तसेच तपासात पोलिसांना सहकार्य करण्याचे निर्देश नील सोमय्या यांना दिले असून अटक झाल्यास ५० हजारांच्या जामिनावर सुटका करण्याचे निर्देश देखील हायकोर्टाने दिले आहेत.

25 ते 28 एप्रिल असे सलग चार दिवस सकाळी 11 ते दुपारी 2 यावेळेत त्यांना चौकशीकरता आर्थिक गुन्हे अन्वेषण कार्यालयात हजेरी लावणं नील सोमय्यांसाठी बंधनकारक राहील असे निर्देश न्यायमूर्ती अनुजा प्रभूदेसाई यांनी आपल्या निकालात दिले आहेत.

काय आहे प्रकरण ?

1971 च्या युद्धामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावणाऱ्या ‘आयएनएस विक्रांत’ या युद्धनौकेवर युद्धस्मारक बनवण्याच्या नावाखाली जमा केलेल्या ५८ कोटींच्या निधीमध्ये भ्रष्टाचार झाला आहे. याप्रकरणी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्याविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली होती.

सोमय्या यांनी जमा केलेला निधी राज्यपालांकडे सुपूर्द करणे अपेक्षित होते. मात्र हे पैसे मिळाले नसल्याची माहिती राजभवनाने दिली आहे. माहितीच्या अधिकारातून ही लेखी माहिती उपलब्ध झाली असून हा पैसा सोमय्या यांनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी आणि पुत्राची कंपनी निकॉन इन्फ्रासाठी वापरल्याचा आरोप राऊत यांनी केला आहे.

दरम्यान, या प्रकरणी किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्या विरोधात ट्रॉमबे पोलीस ठाण्यात माजी सैनिक बबन भोसले यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला. याच प्रकरणाच्या तपासासाठी किरीट सोमय्या पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहात आहेत.

 

Share This News
error: Content is protected !!