पुण्यात माणुसकीला काळीमा! लाथा, बुक्क्या आणि दगडाने मारून मजुराची निर्घुण; हत्येचं धक्कादायक कारण आलं समोर
पुण्यातील येरवडा परिसरात असलेल्या नाल्याचे चेंबर बांधताना बिगारी काम करणाऱ्या मजुराकडून चुकून अंगावर चिखल उडाल्याच्या रागात तरुणांनी लाथा बुक्क्या मारून आणि डोक्यात दगड घालून मजुराची हत्या केली. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
ज्ञानेश्वर निवृत्ती वाघमारे (वय ४४, रा.विकास नगर, किवळे) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. १९ जून रोजी वाघमारे हे येरवडा परिसरात असलेल्या नाल्यावर चेंबर बांधण्याचे काम करत होते. त्यांच्याकडून अनवधनाने रस्त्यावरून जाणाऱ्या तरुणांच्या अंगावर चिखल उडाला. त्यामुळे संतप्त झालेल्या तरुणांनी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी अमानुष मारहाण केली. एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर वाघमारे यांच्या तोंडावर दगड मारले. ज्यात गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना तात्काळ ससून रुग्णालयात दाखल केले होते. मात्र बारा दिवसांच्या उपचारानंतर त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
याप्रकरणी भगवान आसबे (वय ४७) यांच्या तक्रारीवरून एक अल्पवयीन मुलगा, राज सोमनाथ परदेशी (वय.१९, चाकण), प्रणव वाल्मीक अंत्रे (वय.२०, रा.दिघी) आणि चैतन्य रावसाहेब साळवी (रा. विश्रांतवाडी) यांच्यावर खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला होता. मात्र पीडित व्यक्तीचा मृत्यू झाल्याने कलम वाढ करण्यात आली असून राज आणि प्रणव या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर चैतन्य साळवी हा फरार असून अल्पवयीन मुलाला ही ताब्यात घेण्यात आले आहे.
