पुण्यातील वंचितचे लोकसभा 2024 चे उमेदवार वसंत मोरे यांनी दोन महिन्यातच वंचितला “जय महाराष्ट्र” करत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वाटेने जाण्याचा निर्णय घेतला आहे. ‘आता अखेर पर्यंत वंचितच…’, असे म्हणालेल्या मोरेंनी दोन महिन्यातच पक्ष बदलण्याचा निर्णय घेतल्याने राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्यांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. त्यातच आता वसंत मोरे यांनी वंचितला सोडण्याबाबत प्रकाश आंबेडकरांना नेमके काय सांगितले, हे स्वतः मोरे यांनीच स्पष्ट केले आहे.
वसंत मोरे म्हणाले, मी प्रकाश आंबेडकरांना मेसेज केला, साहेब मला माफ करा. माझ्याबरोबर असलेल्या अनेक कार्यकर्त्यांचा मला विचार करायचा आहे. त्यामुळे मी आज हा निर्णय घेत आहे. त्यावर मला आंबेडकरांचा फोनही आला. मात्र मी त्यांना ठीक आहे म्हणालो. पण आता माझा अंतिम निर्णय झालेला आहे.
दरम्यान वसंत मोरे यांची राजकीय कारकीर्द ही शिवसेनेपासूनच सुरू झाली होती. शिवसेना शाखाप्रमुख म्हणून त्यांनी काम केले होते. त्यानंतर त्यांनी मनसे मध्ये प्रवेश केला. अनेक वर्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वात काम केल्यानंतर ऐन लोकसभेच्या काळात त्यांनी मनसेला सोडचिट्टी देत वंचित ची कास धरली. आणि आता विधानसभेच्या मुहूर्तावर पुन्हा एकदा शिवसेना उद्धव ठाकरे गटात पक्षप्रवेश करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यांच्या निर्णयामुळे पुण्यातील वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते चांगलेच संतप्त झाले असून मोरे यांचे कात्रज परिसरात असलेले कार्यालय फोडण्याचा इशाराही त्यांनी दिला. त्यामुळे सध्या मोरे यांच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. दरम्यान या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवर मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन वसंत मोरे हे आज पुण्यात दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी ज्या चौकात शिवसेना शाखाप्रमुख म्हणून राजकारणाची सुरुवात केली होती त्याच दिशेने पुन्हा वाटचाल करत आहे, असा आशयाची पोस्ट लिहीत कार्यकर्त्यांसमवेद पुण्यात दाखल होतानाचा एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे.