जल जीवन अभियानाची प्रलंबित कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करा ; पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

456 0

जल जीवन अभियान हे महत्वकांक्षी अभियान असून त्याअंतर्गत प्रलंबित कामे जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सामाजिक संस्था आदींचा समन्वय साधून ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वछता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

पुणे जिल्हा परिषद येथे जल जीवन अभियान, स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण), महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कामाची सद्यस्थिती व अंमलबजावणी याबाबत घेतलेल्या आढावा बैठकीवेळी ते बोलत होते.

यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे विशेष कार्य अधिकारी चंद्रकांत गजभिये, प्रकल्प संचालक अशोक पाटील, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे मुख्य अभियंता जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी मिलींद टोणपे, भारत शेंडगे आदी उपस्थित होते.

यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले, जल जीवन अभियान, स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण), महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मंत्रालयीन स्तरावर पाठविण्यात आलेले प्रस्ताव तात्काळ मार्गी लावण्यात येतील. घर, शाळा, अंगणवाडीत प्रलंबित नळ जोडणी तातडीने करुन पाणी पुरवठा करा.
जल जीवन अभियानांतर्गत गवंडी, प्लंबर, वीजतंत्री व फीटर या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याची कार्यवाही करावी.

घनकचरा व्यवस्थापनांतर्गत सुरु असेलेली कामे महिन्याअखेर पूर्ण करण्याची कार्यवाही करावी.

खासगी संस्थेला देण्यात आलेली कामे विहित मुदतीत पूर्ण करण्यासाठी त्यांना मनुष्यबळ वाढविण्याच्या सूचना देत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा अनुभवाचा या कामासाठी वापर करण्याच्या सूचना दिल्या.

अभियानाची अंमलबजावणी यशस्वीपणे होण्यासाठी सामाजिक संस्थेचा सहभाग घेत सर्वांच्या सहकार्याने अभियान यशस्वी करावे, असे आवाहन पाटील केले.

Share This News
error: Content is protected !!