कोरोना महामारीवरील विजयाप्रित्यर्थ राष्ट्रवादी काँग्रेसची पुण्यात स्वराज्यपताका

364 0

पुणे- कोरोना महामारीवरील विजयाप्रित्यर्थ राष्ट्रवादी काँग्रेस पुणेच्या वतीने भव्य स्वराज्य पताका फडकाविण्यात आली. यावेळी कोरोनावर मात करण्यासाठी काम केलेल्या विविध क्षेत्रातील योद्ध्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला.

यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख तसेच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशांत जगताप म्हणाले, “समाजातील सर्व घटकांच्या अविश्रांत मेहनत व एकजुटीमुळे कोरोनाचा पराभव करणे शक्य झाले. कोरोना महामारीवरील विजय साजरा करण्यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने भव्य स्वराज्यपताका उभारण्यात आली आहे. या निमित्त कोरोनाच्या विरोधातील लढ्यात अविश्रांतपणे राबणाऱ्या डॉक्टर्स, परिचारीका, शासन, प्रशासन, अँम्ब्युलन्स चालक, सामाजिक कार्यकर्ते अशा सर्वांच्या कष्टाला आम्ही सलाम करीत आहोत. कोरोनामुक्तीचा हा पॅटर्न सामाजिक सद्भाव आणि एकजुटीचा संदेश देतो. या लढ्यात सहभागी सर्वांचे आम्ही आभारी असून त्यांच्या योगदानाबद्दल कृतज्ञ आहोत” अशी भावना जगताप यांनी व्यक्त केली.

प्रदीप देशमुख म्हणाले की, कोरोनाने आपणास काही गोष्टी शिकवल्या. आरोग्याकडे लक्ष देण्यास शिकविले. स्वच्छतेसाठी काम करायला शिकविले. कोरोनामुक्तीची पहाट उगविली असताना हा संदेश आपण विसरता कामा नये. कोरोनामुक्तीचा जागर यावेळी करण्यात आला.

Share This News
error: Content is protected !!