पुणे -मुंबई द्रुतगती मार्गावर एका कारमधून आढळली तब्बल चार कोटी रुपयांची रोकड (व्हिडिओ)

437 0

लोणावळा – पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर एका कारमधून तब्बल चार कोटी रुपयांची बेहिशोबी रोकड आढळून आली. याप्रकरणी सांगलीच्या दोघांना ताब्यात घेतले आहे. विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी ही रक्कम घेऊन जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

याबाबतची माहिती अशी की, बेकायदेशीर शस्त्रांची तस्करी तथा वाहतूक होणार असल्याची टीप पुणे ग्रामीण पोलिसांना सोमवारी (ता.२८) रात्री मिळाली होती. त्यानुसार लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सापळा लावला. मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या (केए ५३ एमबी ८५०८) एका संशयास्पद कारला थांबण्याचा इशारा करूनही ती थांबली नाही म्हणून पोलिसांनी पाठलाग करून तिला अडवले.

या कारची तपासणी केली असता या कारमधून शस्त्रांऐवजी तब्बल चार कोटी रुपयांची बेहिशोबी रोकड मिळाली. ही रोकड पाहून पोलीस देखील चक्रावून गेले.

याप्रकरणी मोटारचालक महेश नाना माने (रा. विटा, जि. सांगली) आणि त्याचा साथीदार विकास संभाजी घाडगे (रा. शेटफळ जि.सांगली) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विधानसभेच्या कोल्हापूर उत्तर मतदारसंघ पोटनिवडणुकीसाठी ही रक्कम घेऊन जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
एवढी मोठी रक्कम कुठून कुठे व कोणत्या कारणासाठी नेण्यात येत होती. त्याबाबतचे समाधानकारक कारण हे दोघे पोलिसांना देऊ शकले नाहीत. हवालाचा हा प्रकार असण्याची शक्यता आहे. याबाबत पोलिसांनी आयकर विभागाला याबाबतची माहिती दिली.

फौजदार सचिन बनकर, अनिल लवटे, कर्मचारी सितारमा बोकड, युवराज बनसोडे, अमित ठोसर, पुष्पा घुगे, गणेश होळकर, किशोर पवार, सिद्धेश्वर शिंदे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!