गरीब बिचारे लाकूडतोडे !

2488 0

चिपळूण : हजारो वर्षांपूर्वी एक गरीब लाकूडतोड्या होता आणि हजारो वर्षांनंतर आज असंख्य ग. बि. (गरीब बिचारे) लाकूडतोडे आपला उदरनिर्वाह कसाबसा चालवीत आहेत. ज्याला (प्रामाणिकपणामुळे)वनदेवी प्रसन्न झाली होती त्याला सोने, चांदी आणि लोखंडी अशा तीन कुऱ्हाडी मिळाल्या. आताच्या लाकूडतोड्यांवर सरकार, मंत्री, पुढारी, अधिकारी प्रसन्न असल्याने कुऱ्हाडी बरोबरच अत्याधुनिक करवती आल्या, मशिनरी आली! तो गरीब लाकूडतोड्या दिवसभरात एखादी मोळी विकत होता. आताचे गरीब लाकूडतोडे ट्रक भरभरून अनेक अडथळे (नाके) कसेबसे पार करून लाकूड विकतात आणि आपल्या कुटुंबाला दोन घास खाऊ घालतात. त्यांना आजही घरात बारसे असेल, लग्न असेल अगदी कोणाचे उत्तरकार्य असेल तर आपल्या मालकीची पाच पन्नास झाडं विकून त्यातून येणाऱ्या पैशातून हे सर्व करावं लागते. (त्यांच्याकडे कोणी शिकले नाही, नोकरी नाही, दुसरा व्यवसाय नाही) इतकी बिकट परिस्थिती हजारो वर्षानंतरही कायम आहे. आजही त्यांच्या नशिबी चंद्रमौळी झोपडीच आहे. आलिशान फ्लॅट, बंगले, थार, फोरच्युनर, इनोव्हा, स्कोडा अशा आलिशान गाड्या त्यांच्या स्वप्नात येतात. त्यात ते थोडावेळ राहतात, थोडावेळ फिरतात. सोन्याच्या अंगठ्या, साखळ्या, कडी हेही सर्व स्वप्नात दिसते. अशा छान छान स्वप्नात रममाण असतानाच नतद्रष्ट वृक्षप्रेमी पाठीस लागतात आणि श्रीमंतीच्या स्वप्नाचा भंग होतो.

सकाळी उठून पुन्हा आपले तेच रूटीन. जंगल अधिकाऱ्यांकडे जा, पास काढा, तोडायला किती झाडं आहेत त्याची मोजदाद करा, झाडं तोडा, तेवढीच झाडं पुन्हा लावा, त्यात जंगल अधिकारी, कर्मचारी फारच कडक आणि प्रामाणिक असल्याने परवानगीपेक्षा एक झाडही जादा तोडता येत नाही, एकाच पासावर अनेकवेळा वाहतूक करता येत नाही. नियमानुसार झाडं लावून लावून अनेकांच्या हाताला अक्षरशः फोड आले आहेत. त्यात लावलेली सगळीच झाडं जगत असल्याने दरवेळी नवीन खड्डे मारावे लागतात ते वेगळेच. या झाडांमधून वाट काढत काढत तोडायची झाडं शोधायची म्हणजे पुरेवाट होते. काही ठिकाणी इतकी दाट झाडी वाढली आहे की तिथे सूर्यकिरणे जमिनीपर्यंत पोचतच नाहीत. शेवटी थोडीतरी ऊब मिळावी म्हणून लाकूडतोड्याना उजाड माळरानावर यावे लागते.

एक तर प्रचंड कष्ट, पाचवीला पुजलेली गरिबी यातून कसाबसा उदरनिर्वाह करायचा, चटणी भाकरी खायची, कपडे मिळाले तर ठीक नाहीतर वल्कले नेसायची, मुलाबाळांना वस्तीवरच्या मराठी शाळेतच धाडायचे हे कमी म्हणून की काय पर्यावरणप्रेमी की कोण असतात ते वास्कन अंगावर येतात. एकवेळ बिबट्या, डुक्कर अचानक अंगावर आलं तरी भीती वाटत नाही. (रोज झाडं तोडता तोडता त्यांच्याशी चांगली घसमट झाली आहे. झाडं तुटली तर काळजी करु नका. मानवी वस्तीत तुम्हाला आश्रय मिळेल असे आश्वासन दिल्याने तेही निश्चिंत झालेत.) पण या शहरात सिमेंटच्या जंगलात राहणाऱ्या पर्यावणप्रेमींनी जरा जरी सळसळ केली तरी दरदरून घाम फुटतो. त्यांनाही आम्ही मध्येच प्रेमळ शब्दात आव्हान देतो, आमच्याशी असे फटकून वागत जाऊ नका असे समजावूनही सांगतो, पण त्यांच्यातला वृक्षप्रेमाचा ‘ किडा ‘ काही केल्या जात नाही.

पूर आला, दुष्काळ पडला, दरड कोसळली, पाऊस कमी झाला, उन्हाळा वाढला, प्रदूषण वाढले आणखी काय काय होईल त्यासाठी आम्हालाच जबाबदार धरतात हे कोणत्या शास्त्रात , नियमात बसते? आम्ही गरीब आहोत म्हणून तुम्ही आम्हाला टार्गेट करता का? तुमच्या दारात साधी तुळस तरी लावली आहे का पहा आणि मग ‘जंगल , जंगल ‘ ओरडा. इतकंच असेल तर एक दिवस आमच्या कुणाच्याही चंद्रमौळी झोपडीत या, गुळाचा खडा आणि पाणी घेऊ, वृक्षतोड, वृक्षवाढ, लागवड, झाडांचे प्रकार, तोडीची पद्धत अशा सर्व बाबतीत दोन दिवस समोरासमोर बसून साधकबाधक चर्चा करू आणि एकदाच या विषयावर ‘ तोड ‘ पाडू… आता गरीब बिचाऱ्याला तो. च्या आवाहनाला पर्यावरणवादी प्रतिसाद देतात का हे पहावे लागेल.

मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण

Makrand Bhagwat

Share This News
error: Content is protected !!