Mumbaicha dabewala

Dasara Melava : ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जाणार नाही; मुंबईच्या डबेवाल्यांचा मोठा निर्णय

1340 0

मुंबई : दसरा मेळाव्याच्या (Dasara Melava) आधी ठाकरे गटासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. या मेळाव्याला न जाण्याचा निर्णय मुंबईच्या डबेवाल्यांनी घेतला आहे. आतापर्यंत आम्ही शिवसेना ठाकरे गटाशी प्रामाणिक राहिलो आहोत पण यंदा दसरा मेळाव्याला जाणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. आधी मराठा आरक्षण आणि मगच पक्ष अशी भूमिका डबेवाल्यांनी घेतली आहे. त्यामुळे मुंबई डबेवाले आज शिवतीर्थावर दसरा मेळाव्याकरता जाणार नाहीत हे स्पष्ट झालं आहे.

आम्ही बहुतांश डबेवाले आणी डबेवाल्यांचे कुटुंबीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत प्रामाणिक राहीलो आहे आणि या पुढेही राहू. परंतु मराठा आरक्षण लढ्याची पार्श्वभूमी पहाता आणि मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम पहाता या वर्षी डबेवाले शिवतिर्थावर मेळाव्याला उपस्थित राहणार नाहीत. सध्या या लढ्याचे नेतृत्व मनोज जरांगे पाटील करत आहेत. या लढ्यात आम्ही त्यांच्या सोबत आहोत अशी माहिती मुंबई डबेवाला असोशिएशनचे अध्यक्ष सुभाष गंगाराम तळेकर यांच्याकडून देण्यात आली आहे.

तसेच आम्हाला बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मान्य असल्यामुळे शिवतीर्थावरील दसरा मेळाव्याला आम्ही वाजत गाजत, गुलाल उधळत जात होतो. मुंबईचे डबेवाले शिवसेनेसोबत कालही होते, आजही आहेत आणि उद्याही राहतील. परंतु मराठा आरक्षण लढ्याच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांच्या आवाहनाला आम्ही प्रतिसाद दिला आहे. पहिला मराठा आरक्षण मग पक्ष, ही भूमिका आमची राहणार आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला शक्य तितके बळ देण्याचा प्रयत्न आमचा राहील असंही डबेवाल्यांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Share This News
error: Content is protected !!