Kolhapur News

Kolhapur News : महिलेने दारु पिताना पाहिलं आणि बेरोजगार इंजिनिअरने थेट तिलाच संपवलं

536 0

कोल्हापूर : कोल्हापूरमधून (Kolhapur News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये दारू पीत असल्याची माहिती घरात सांगितल्याच्या रागातून एका तरुणाने वृध्द महिलेची डोक्यात दगड घालून हत्या केली आहे. ही घटना कोल्हापुरातील सुभाषनगरातील हरिव चर्चच्या कंपाउंड लगत घडली आहे. लक्ष्मी विलास क्षीरसागर (वय 65, मूळ गाव कामेरी, ता. वाळवा, जि. सांगली, सध्या रा. संत रोहिदास कॉलनी, सुभाषनगर) असे मृत वृद्ध महिलेचे नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी अवघ्या काही तासांत या प्रकरणाचा छडा लावला आहे.

काय घडले नेमके?
लक्ष्मी क्षीरसागर या 21 तारखेला रात्री आठच्या सुमारास नातीला घेऊन नवरात्र कार्यक्रम पाहण्यासाठी गेल्या होत्या. दरम्यान नातीला सोडल्यानंतर त्या घरी परतल्या नाहीत यामुळे कुटुंबियांनी परिसरात त्यांचा शोध घेतला. मात्र, त्या न सापडल्याने मुलगा गणेश क्षीरसागर याने राजारामपुरी पोलिस ठाण्यात आई बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान काल सकाळी सुभाषनगरातील हरिव चर्चच्या कंपाऊंडलगत एका वृद्धेचा खून झाल्याची माहिती समोर आली. माहिती मिळताच राजारामपुरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन या घटनेचा तपास सुरु केला.

लक्ष्मी यांचा मृतदेह दगडाने ठेचून खून केल्याने चेहरा छिन्नविछिन्न झाला होता. मात्र, शरीरावरील कपड्यांमुळे आणि शरीरयष्टी वरून या लक्ष्मी क्षीरसागर असल्याचे मृत महिलेच्या नातेवाईकांनी ओळखले. दरम्यान, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी वेगाने तपासाची सूत्रे हलवत अज्ञात संशयित आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्यांना प्रतिक गुरुले हा संशयित आढळून आला. त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा कबुल केला आहे.

या कारणामुळे केला खून
संशयित आरोपी प्रतीक याने सिव्हिल डिप्लोमा केला असून सध्या नोकरी नसल्याने बेरोजगार आहे. बेरोजगारीमुळे त्याला दारूचे व्यसन लागले होते. तीन आठवड्यांपूर्वी लक्ष्मी क्षीरसागर यांनी प्रतीकला दारू पिताना पाहिले होते. यानंतर त्यांनी याची माहिती प्रतिकच्या कुटुंबियांना दिली होती. यामुळे प्रतिकचे त्याच्या कुटुंबियांशी भांडण झाले होते. दारू पित असल्याची माहिती दिल्याने लक्ष्मी यांच्याबद्दल आरोपीच्या मनात राग होता. यामुळे याच रागातून आरोपी प्रतीकने लक्ष्मी यांचा खून केला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Share This News
error: Content is protected !!