सातारा : साताऱ्यात (Satara News) अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये पोलिसांच्या गाडीने 4 जणांना उडवलं आहे. यामधील एकाच मृत्यूदेखील झाला आहे. साताऱ्यातील कराड ढेबेवाडी मार्गावर हा अपघात झाला आहे. या घटनेमुळे साताऱ्यात खळबळ उडाली आहे. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केलं. हा अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलीस करत आहेत.
कराड ढेबेवाडी मार्गावर कुसूर गावच्या हद्दीत झालेल्या या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एकजण गंभीर जखमी आहे. तर अन्य दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सुजल कांबळे असे या अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. शंकर खेतमर हा पोलीस कर्मचारी ही अपघातग्रस्त गाडी चालवत होता. ढेबेवाडी पोलीस ठाण्याच्या दिशेला जाताना हा भीषण अपघात झाला. अपघातात एका दुचाकीचे आणि पोलिसांच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.जखमीवर कराडच्या कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
सुजल कांबळे याच्या मृत्यूनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले होते. तर अपघातात आणखी तिघे तरुण जखमी झाले आहे. कराड – ढेबेवाडी मार्गावर रविवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास हे चार तरुण रस्त्याच्या कडेला उभे राहून गप्पा मारत होते. त्याचवेळी कोळेवाडीकडून ढेबेवाडीकडे निघालेल्या भरधाव पोलीस गाडीने या तरुणांना उडवले. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.