Virar News

Virar News : हृदयद्रावक ! देवीच्या दारातच भक्ताने सोडले प्राण

1079 0

विरार : शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली असून यानिमित्ताने विरारच्या (Virar News) प्रसिद्ध जीवदानी गडावर लाखो भाविक जीवदानी माता मंदिरात देवीच्या दर्शनासाठी येत असतात. यादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये देवीच्या दर्शनासाठी आलेल्या एका भाविकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. देविदास भवरलाल माळी (वय 41) असे मृत पावलेल्या भाविकाचे नाव आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
अंधेरी पश्चिमेकडील डुगरे चाळ परिसरातील रहिवासी असलेले देविदास भवरलाल माळी व त्यांचे मित्र दुर्गाशंकर मनेरिया असे दोघेजण नवरात्रोत्सवानिमित्त विरार येथील जीवदानी गडावर देवीच्या दर्शनासाठी आले होते. गडाच्या पायथ्याशी असलेल्या गणपती मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. त्यानंतर रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास जीवदानी गड पायऱ्यांच्या मार्गाने चढण्यास सुरुवात केली.गड चढून अर्ध्या वाटेवर गेल्यानंतर देविदास भवरलाल माळी यांच्या छातीत अचानक दुखू लागले व त्यांना अस्वस्थ वाटू लागले.

यानंतर बेशुद्ध अवस्थेत असलेल्या देविदास यांना इतर भाविकांच्या मदतीने तातडीने फर्निक्युलर ट्रेनद्वारे पायथ्याशी आणण्यात आले आणि रुग्णवाहिकेतून विरार पश्चिमेच्या संजीवनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी विरार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जीवदानी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकाचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News
error: Content is protected !!