Nashik Crime

Nashik Crime : वडिलांना मारहाण केल्याचा धक्का सहन न झाल्याने तरुणाने उचलले ‘हे’ पाऊल

615 0

नाशिक : धार्मिक नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिक शहरात (Nashik Crime) गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. यामध्ये हत्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. शहरातील पंचवटी परीसरात असलेल्या मखमलाबाद नाका येथे कुसुमाग्रज उद्यान जवळ एका युवकावर पूर्ववैमनस्यातून टोळक्याने चाकूहल्ला केला आहे. या हल्ल्यात सागर विष्णू शिंदे (वय 28, रा. मखमलाबाद नाका) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
सागर विष्णू शिंदे याचे याच परिसरात राहणाऱ्या केदार साहेबराव इंगळे याच्याशी वाद झाले होते. शुक्रवारी दुपारी मयत सागर शिंदे व त्याचा मित्र आकाश इंगळे, योगेश वाघ हे याच परिसरातील एका बंद गोडाउनजवळ बसून मद्यपान करीत होते. ही माहिती केदार साहेबराव इंगळे यास समजताच इंगळे याने ऋषिकेश आहेर व अन्य काही मित्रांसह गोडाउनजवळ धाव घेतली. त्या ठिकाणी सागर शिंदे आणि इंगळे यांच्यात बाचाबाची झाली. यानंतर त्या टोळक्यांनी सागरवर चाकूहल्ला करून घटनास्थवरून पळ काढला.

दरम्यान, मयत सागर शिंदे याचे मारेकरी केदार इंगळे यांच्या वडिलांची वाद झाले होते. या वादात सागर शिंदे यांनी केदार इंगळेच्या वडिलांना मारहाण केल्याची माहितीसूत्रांकडून देण्यात आली होती. वडिलांना मारहाण केल्याचा राग मनात धरून केदार इंगळे आणि त्याचे इतर अन्य साथीदारांनी सागर शिंदे याच्यावर सशस्त्र हल्ला केला.

या हल्ल्यात सागर शिंदेच्या मानेवर आणि तोंडावर वार करण्यात आले आहे. वर्मी घाव लागल्याने सागर शिंदे याचा जागीच मृत्यू झाला. आरोपी मारेकऱ्यांकडून सागर शिंदे यांच्या गाडीची देखील तोडफोड करण्यात आली. या हल्ल्याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत मुख्य संशयित आरोपी केदार साहेबराव इंगळेसह ऋषिकेश आहेर दीपक दगळे, नुकुल चव्हाण या चार आरोपींना पोलिसांनी अवघ्या दोन तासात अटक केली. पंचवटी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!