मुंबई : भारत आणि पाकिस्तान सामना म्हटलं की तो क्रिकेटपेक्षाही बराच मोठा विषय असतो. त्यातच आता या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील विश्वचषकामधील सामना अवघ्या काही तासांवार येऊन ठेपला असतानाच शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या सामन्याबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. पाकिस्तानचे भव्य स्वागत हे फक्त गुजरातध्येच आणि मोदी शाहांच्या राज्यात होऊ शकते. आज जर बाळासाहेब असते तर यांना बुटाने मारले असते, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
यावेळी संजय राऊत यांनी अपात्रततेच्या सुनावणीवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राच्या विधिमंडळात ज्यांचे कान न्यायालयाने उपटले. विधिमंडळाला एक परंपरा आहे आणि महान लोक या खुर्चीवर बसले आणि त्यांनी संविधानाचे रक्षण केलं. पण आज दुर्दैवाने एक वर्षापासून घटनाबाह्य सरकार या महाराष्ट्रावर बसवलं गेलं आहे आणि यांचे संरक्षण हे विधानसभा अध्यक्ष करत आहेत.सर्वोच्च न्यायालयाने पोरखेळ हा शब्द वापरला इतिहासामध्ये अशा प्रकारची भूमिका कधी या देशात घेतली नव्हती आणि या महाराष्ट्राची प्रतिमा धूळीस मिळवण्याचा काम हे विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्री सरकार हे सगळे करत आहेत.
 
                         
                                 
                             
                             
                             
                            