Jalna News

Jalna News : आजनंतर मी कोणाला भेटणार नाही… भावाला अखेरचा फोन केला अन्…

966 0

जालना : जालन्यामध्ये (Jalna News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये शहरातील मोती तलावामध्ये एका अठरा वर्षीय तरुणाने उडी मारून आत्महत्या केली आहे. मंगळवार संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली आहे. जालना शहरातील मंठा चौफुली येथील रहिवासी असलेल्या 18 वर्षीय कुणाल किशोर कांबळे यांनी दुपारच्या सुमारास त्याच्या भावाला फोन केला. ‘आजच्या नंतर मी कोणाला भेटणार नाही’, असे सांगून फोन कट केला.

काही वेळ भाऊ देखील भांबावून गेला. काय करावे त्याला काहीच कळेना. या अचानक आलेल्या फोनच्या धक्क्यातून सावरत त्याने याची माहिती घरच्यांना व नातेवाईकांना दिली. त्यानंतर घरच्यांनी व नातेवाईकांनी कुणालचा शोध घ्यायला सुरुवात केली. त्याच्या मित्रांकडे विचारपूस केली मात्र त्याचा कुठंच पत्ता लागला नाही. यानंतर नातेवाईकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली.

यादरम्यान एका युवकाने शहराच्या मोती तलावात उडी घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती तात्काळ चंदनझिरा पोलिसांना देण्यात आल्यावर पोलिसांनी तात्काळ मोती तलावाकडे धाव घेऊन नागरिकांच्या मदतीने या तरुणाचा शोध घेतला. यादरम्यान चंदनझिरा पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली शेख चांद पाशा व अलीम तांबोळी या पट्टीच्या पोहणाऱ्या तरुणांनी मोती तलावात उडी घेत कुणालने ज्या ठिकाणी उडी घेतली होती त्या ठिकाणी शोध घेतला असता कुणालचा मृतदेह आढळून आला. आपल्या मुलाचा मृतदेह बघून कुणालच्या कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. त्याने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचा तपास पोलीस करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!