Sangli Crime

Sangli Crime : WhatsApp वर अश्लील मेसेज पाठवल्याच्या रागातून 5 जणांकडून तरुणाची हत्या

521 0

सांगली : सांगलीमध्ये (Sangli Crime) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये व्हॉट्सअ‍ॅपवर अश्लील मेसेज पाठवत असल्याचा राग मनात धरून एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ शहरात ही घटना घडली आहे. सुशिल सुर्यकांत आठवले असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह म्हैसाळच्या कालव्यात टाकून देण्यात आला.

सातव्या दिवशी लंगरपेठ गावाच्या हद्दीत म्हैशाळ योजनेच्या बोगद्यातील विहीरीत सदरचा मृतदेह सापडला. या खुनप्रकरणी पाच संशयितांना अटक केली आहे. कवठेमहांकाळ शहरामधील 23 वर्षीय तरुणाला कवठेमहांकाळ येथील जनावरांच्या बाजारातील शेडजवळ लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला खाजगी अ‍ॅम्बूलन्समधून काही अंतरावर नेण्यात आलं. यानंतर त्या ठिकाणी त्याची हत्या करून मृतदेह लोखंडी पुलावरून म्हैसाळ योजनेच्या कालव्यात टाकण्यात आला होता.

कवठेमहांकाळ येथील चैतन्य नामदेव माने, सुनिल मारुती माने या दोघांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांसमोर हजर होत आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. गुरुवारी मेघा सुर्यकांत आठवले यांनी आपला मुलगा सुशिल हा बेपत्ता झाला असल्याची फिर्याद दिली. मेघा आठवले यांच्या फिर्यादीनंतर या पाच जणांच्या विरोधात खुनाच्या उद्देशाने अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर चैतन्य नामदेव माने आणि सुनिल मारुती माने यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांनी कवठेमहांकाळ पोलिसांच्या ताब्यात दिले तसेच अनुज अमृत माने, अनिल मारुती माने आणि ऑल्विन संजय वाघमारे या तिघांनादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Share This News
error: Content is protected !!