मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरला (Ranbir Kapoor) ईडीनं समन्स बजावलं आहे. 6 ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ‘महादेव बुक’ ऑनलाइन बेटिंग अॅप प्रकरणी रणबीर कपूरला अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) समन्स बजावण्यात आलं आहे. रणबीर कपूर हा अॅपचे प्रमोशन करत होता आणि रणबीरला यासाठी मोठ्या प्रमाणात रोख मिळाली आहे, असा दावा ईडीकडून करण्यात आला आहे.
‘महादेव बुक’ ऑनलाइन बेटिंग अॅप प्रकरणात रणबीर कपूरचे नाव पुढे आले आहे. या ऑनलाइन बेटिंग अॅप प्रकरणातील आरोपी सौरभ चंद्राकरच्या लग्नाला रणबीरने हजेरी लावली होती. या प्रकरणात रणबीर कपूरच्या आधी 14 बॉलिवूड स्टार्सची नावे समोर आली होची. या यादीत सनी लिओनीपासून नेहा कक्करपर्यंतच्या सेलिब्रिटींच्या नावांचा समावेश आहे.
महादेव ऑनलाईन गेमिंग अॅपशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने गेल्या काही दिवसांत मुंबईसह राज्यात विविध ठिकाणी छापेमारी केली. त्या दरम्यान 14 बॉलिवूडकर ईडीच्या रडारवर आले. महादेव अॅपच्या संस्थापकाचे आणखी 4 ते 5 असेच अॅप आहेत. या अॅप्सचे कॉल सेंटर श्रीलंका, नेपाळ, यूएई या ठिकाणी आहेत.
रणबीर कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास मार्च महिन्यामध्ये रणबीर कपूरचा ‘तू झूठी मैं मक्कार’ हा चित्रपट रिलीज झाला. आता रणबीरचा ‘अॅनिमल’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. काही दिवसांपूर्वी रणबीरच्या ‘अॅनिमल’ या चित्रपटाचा टीझर रिलीज झाला होता. या टीझरमधील रणबीरच्या लूकने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले होते.