सातारा : सातारा (Satara Crime) तालुक्यातील कोंडवे या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली होती. यामध्ये एका प्रेमीयुगुलाने तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. यामध्ये तरुणीचा मृतदेह रविवारी रात्री, तरुणाचा आज ( 2 ऑक्टोबर) सोमवारी सकाळी मृतदेह सापडला. अक्षय ज्योतीराम पवार (वय 26), गौरी चव्हाण (वय 23, दोघेही रा. दिव्यनगरी, शाहूपुरी, सातारा) अशी आत्महत्या केलेल्या प्रेमीयुगुलाचे नाव आहे. या दोघांनी नेमकी कोणत्या कारणामुळं आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
प्रेमीयुगुलाचे मृतदेह शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमला शोधण्यात यश
प्रेमीयुगुलाचे मृतदेह शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमला शोधण्यात यश आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अक्षय आणि गौरी या दोघांनी रविवारी तलावात उडी मारून आत्महत्या केली. यानंतर त्यांच्यासोबत असलेल्या एका व्यक्तीने या प्रकाराची माहिती सातारा तालुका पोलिसांना दिल्यानंतर पोलिस तातडीने दाखल झाले. यानंतर शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमचे जवानही तेथे पोहोचल्यानंतर शोधमोहीम हाती घेण्यात आली.
रविवारी रात्री उशिरा गौरीचा मृतदेह सापडला तर आज सकाळी तरुणाचा मृतदेह सापडला. दोघांचेही मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, हे अद्याप समोर आले नाही. सातारा पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.