उद्यापासून सर्वसामान्यांसाठी खुली होणार प्राणी संग्रहालयांची दारं

464 0

कोरोनामुळे बंद असलेले महापालिकेचे कात्रज येथील स्वर्गीय राजीव गांधी प्राणी संग्रहालय व वन्य संशोधक केंद्र रविवारपासून पुणेकरांसाठी पुन्हा खुले होणार आहे. 

तब्बल 2 वर्षे 5 दिवसांनी हे संग्रहालय ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत पर्यटकांसाठी खुले होत आहे. यापूर्वी 14 मार्च 2020 मध्ये सकाळी हे प्राणिसंग्रहालय उघडण्यात आले होते. त्याच दिवशी दुपारी महापालिकेने करोना संकट लक्षात घेऊन ते बंद करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर हे संग्रहालय खुले होत आहे.

प्रशासनाकडून पर्यटकांच्या स्वागतासाठी संग्रहालयातील स्वच्छतेचे तसेच आवश्‍यक कामे वेगाने करण्यात येत आहेत. त्यात, खंदकाची स्वच्छता, सिमा भिंतीची तपासणी, बुकिंग ऑफिस, सुरक्षा यंत्रणेचा आढावा घेण्यात येत आहे. दरम्यान, मागील दोन वर्षांपासून संग्रहालय पाहण्यासाठी आतमध्ये ठेवलेल्या बॅटरी ऑपरेटेड गाड्या बंदच असल्याने त्याच्या दुरूस्तीचे कामही हाती घेतले असून पुढील काही दिवसांत त्या पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. तसेच, पर्यटकांसाठी आवश्‍यक असलेली पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्वच्छतागृहांची दुरूस्तीचे कामही प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तसेच, जवळपास दोन वर्षांनी त्यातही रविवारच्या दिवशी संग्रहालय सुरू होत असल्याने पहिल्याच दिवशी गर्दी होण्याची शक्‍यता लक्षात घेऊन प्रशासनाकडून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात येणार आहे.

लस प्रमाणपत्राशिवाय प्रवेश नाही

प्राणी संग्रहालयात करोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन डोस घेतलेल्या व्यक्‍तींनाच प्रवेश दिला जाणार आहे. हे प्रमाणपत्र नसल्यास प्रवेश दिला जाणार नसल्याचे संग्रहालयाचे व्यवस्थापक डॉ. राजकुमार जाधव यांनी स्पष्ट केले. प्राणिसंग्रहालय सुरू करण्यासाठीच्या नियमावतील ही प्रमुख सूचना असून त्याचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. प्रमाणपत्र नसल्यास कोणत्याही स्थितीत संबंधितांना प्रवेश दिला जाणार नाही. त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. जाधव यांनी केले आहे.

Share This News
error: Content is protected !!