Pune ST Bus Accident

Pune ST Bus Accident : रिक्षाला वाचविण्याच्या नादात ST बसचा भीषण अपघात; चालकाचा अंदाज चुकला अन्…

5752 0

पुणे : पुणे शहरात (Pune ST Bus Accident) मंगळवारी दुपारच्या सुमारास अचानक पाऊस सुरू झाल्याने, पावसापासून आडोशासाठी चिंचवड येथील सेंट मदर तेरेसा पुलाखाली काही नागरिक थांबले होते. त्याचवेळी बोरीवलीवरून पुण्याकडे जाणारी एसटी या ठिकाणाहून जाताना मध्येच रिक्षा अचानक आडवी आली. यावेळी एसटीचालकाने प्रसंगावधान रिक्षाला वाचविण्याच्या नादात बस रोडच्या बाजूला घेतली मात्र त्यावेळी त्याचा अंदाज चुकला आणि बस थेट रस्त्यावरील डिव्हायडरला जाऊन आदळली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत.

काय घडले नेमके?
गणेशोत्सवानिमित्त परिवहन महामंडळाने नागरिकांसाठी ज्यादा गाड्यांची सोय केली. पाचोरा डेपोचे चालक तानाजी सरवदे हे बोरिवली ते पुणे या मार्गात सेवा बजावत होते. चिंचवड येथील जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरून जाताना सेंट मदर तेरेसा उड्डाण पुलाखाली आल्यानंतर एका रिक्षाचालकाने अरुंद जागेतून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अपघात होऊ नये, तसेच रिक्षाचालकाचेही नुकसान होऊ नये, म्हणून बसचालक सरवदे यांनी बस रस्ता दुभाजकाच्या बाजूस वळवली. मात्र त्यांचा अंदाज चुकला आणि बस डिव्हायडरला जाऊन आदळली.

हा अपघात झाला तेव्हा बसमध्ये 32 प्रवासी होते. प्रसंगावधान राखून चालकाने बसवर नियंत्रण ठेवले. यामध्ये बसचे नुकसान झाले. मात्र सर्व प्रवासी, बसचालक आणि वाहक सुखरूप आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. या अपघातानंतर रोडवरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. हा अपघात पाहण्यासाठी बघ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यानंतर बसमधील प्रवाशांना दुसर्‍या बसमधून पुढील प्रवासासाठी पाठवून देण्यात आले.

Share This News
error: Content is protected !!