Sangli News

Sangli News : धक्कादायक! गणेश विसर्जन मिरवणुकीत आला; अन् जीव गमावून बसला

1113 0

सांगली : सांगलीमध्ये (Sangli News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये तासगाव तालुक्यातील कवठेएकंद येथे डॉल्बीच्या प्रचंड आवाजामुळे एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला आहे. शेखर पावसे असे त्या तरुणाचे नाव आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
कवठे एकंद येथे सोमवारी रात्री अनेक मंडळांच्या गणपतीचे विसर्जन होते. विसर्जन मिरवणुकीनिमित्त प्रत्येकाने डॉल्बीची व्यवस्था केली होती. सायंकाळी सात वाजल्यापासूनच गावातील चौका चौकात डॉल्बीचा दणदणाट सुरू होता. मिरवणुकीच्या निमित्ताने तासगाव पोलिसांचा बंदोबस्तही तैनात होता. मात्र विविध मंडळांनी तासगाव पोलिसांच्या नाकावर टिचून, तसेच न्यायालयाचा डेसिबल बाबतचा आदेश धुडकावत डॉल्बी सुरू केला होता. यादरम्यान डॉल्बीच्या चालकांमध्ये अक्षरशः आवाजाची स्पर्धा लागली. एकमेकांना खुन्नस देऊन आवाज वाढवण्यात आला. या आवाजामुळे गाव हादरत होते.

या मिरवणुकीमध्ये शेखर पावसे हा युवकही आला होता. शेखर याची आठ ते दहा दिवसांपूर्वीच अँजिओप्लास्टी झाल्याचे समजते. तरीही तो गणेश विसर्जन मिरवणुकीत आला होता. रात्री स्टॅन्ड चौकात या मिरवणुका आल्यानंतर डॉल्बीचा आवाज त्याला सहन झाला नाही. अचानक त्याला अस्वस्थ वाटू लागले. छातीत दुखू लागले त्यामुळे त्याला तासगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉल्बीच्या प्रचंड आवाजामुळे हृदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणात जर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून डॉल्बीच्या आवाजावर नियंत्रण ठेवले असते तर कदाचित शेखरचा जीव वाचला असता. शेखर याचा पलूस येथे गाड्यांच्या बॉडी दुरुस्तीचा व्यवसाय होता. कमी वयात युवा उद्योजक म्हणून त्याने नावलौकिक मिळवला होता. त्याला एक ४ वर्षांची मुलगी आहे. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News
error: Content is protected !!