मुंबई : शिवसेना (Shivsena) आमदार अपात्रता याचिकेच्या सुनावणी प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. यामध्ये महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दोन प्रतिस्पर्धी गटांतील 54 शिवसेना आमदारांना नव्याने नोटीस बजावली आहे. यामध्ये त्यांना सोमवारी दुपारी 3 वाजता विधानभवनात सुनावणीसाठी बोलावलं आहे. विधानसभेपूर्वीच्या सर्व अपात्रतेच्या याचिका एकत्र करून ही नोटीस बजावण्यात आली आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
मागच्या वर्षी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून उठाव केल्यानंतर पक्षात मोठी फूट पडली होती. एकनाथ शिंदे यांच्या उठावामुळे शिवसेनेत दोन गट पडले. शिवसेनेतील अनेक आमदारांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दर्शवल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. यामुळे उद्धव ठाकरे यांना आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यानंतर ठाकरे गटाकडून शिंदेंना पाठिंबा दिलेल्या आमदारांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली.
या आमदारांना अपात्र ठरवण्यात यावं अशी मागणी या याचिकेत करण्यात आली होती. तर दुसरीकडे निवडणूक आयोगानं शिंदे यांना पक्षाचं नाव आणि चिन्ह दिल्यानंतर शिंदे समर्थक आमदारांकडूनदेखील याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवलं आहे. विधानसभा अध्यक्षांसमोर या प्रकरणात सुनावणीला सुरुवात झाली आहे. आता याच प्रकरणात महाराष्ट्र विधिमंडळाच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी दोन प्रतिस्पर्धी गटांतील 54 शिवसेना आमदारांना नव्यानं नोटीस बजावून सोमवारी दुपारी 3 वाजता विधानभवनात सुनावणीसाठी हजर राहण्यास सांगितले आहे.