कोल्हापूर : सध्या सगळीकडे गणपतीचे आगमन झाले आहे. यादरम्यान कोल्हापूरमधून (Kolhapur News) एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मुंबईतून सुट्टी घेऊन गावी आलेल्या गणेशभक्ताचा बाप्पाचे स्वागत करताना दारात पाय घसरून डोक्यावर पडल्याने करुण अंत झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील बोलकेवाडी या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडली आहे. सचिन शिवाजी सुतार (वय 38) असे दुर्दैवी गणेशभक्ताचे नाव आहे. दोन्ही पाय घसरून डोक्यावर पडल्याने गंभीर इजा झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्यागोदरच त्यांचा मृत्यू झाला होता.
काय घडले नेमके?
सचिन मुंबईत खासगी कंपनीत नोकरीस होते. पत्नी आणि मुलाला मुंबईत ठेवून ते गणेशोत्सवासाठी सोमवारी गावी आले होते. गणरायाच्या स्वागतासाठी घरी जय्यत केली होती. मंगळावी बाप्पांची मूर्ती आणण्यासाठी ते मित्रासोबत गेले होते. त्यांचा गणपती मित्र घेऊन आल्यानंतर दारात पोहोचले. गणपती स्वागत करून घरात घेण्यासाठी ते आईला हाक मारत धावत घरी गेले.
त्यावेळीच त्यांचा पाय फरशीवरून घसरल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने आजऱ्यातील खासगी रुग्णालयात नेण्यात आले मात्र त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. विघ्नहर्त्याच्या स्वागतासाठी धांदल सुरु असताना अशा पद्धतीने सचिन यांच्यावर मृत्यू ओढवल्याने बोलकेवाडी गावात शोककळा पसरली आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने सुतार कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.