नाशिक : नाशिकमध्ये (Nashik News) एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये नाशिकच्या आडगावमध्ये पतीने पत्नीची निर्घृण हत्या करुन स्वतःला संपवल्याची घटना घडली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पतीने गळफास घेऊन आपल्यादेखील आयुष्याचा शेवट केला आहे. पत्नी गाढ झोपेत असतानाच आरोपीने तिची हत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
काय घडले नेमके?
बुधवारी पहाटेच्या सुमारास आडगाव परिसरातील इच्छामनी नगर परिसरात ही हादरवणारी घटना घडली आहे. विशाल निवृत्ती घोरपडे असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. तर प्रिती विशाल घोरपडे असं हत्या झालेल्या पत्नीचे नाव आहे.पत्नी झोपेत असताना विशाल निवृत्ती घोरपडे याने मुसळी डोक्यात टाकत तिची हत्या केली.
धक्कादायक म्हणजे पत्नी झोपेत असताना त्याने निर्घृणपणे तिची हत्या केली. यानंतर त्याने स्वतःदेखील गळफास घेऊन आत्महत्या केली. आरोपीने पत्नीची हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. या हत्येमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नाशिक पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.