Nawab Malik : नवाब मलिकांना मोठा दिलासा ! ‘त्या’ प्रकरणी नियमित जामीन अर्ज मंजूर
मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना मोहित कंबोज यांच्या मानहानी प्रकरणात मोठा दिलासा मिळाला आहे. मोहित कंबोज बदनामी प्रकरणात शिवडी कोर्टाकडून त्यांना नियमित जामीन मंजूर करण्यात आला आहे. दोन लाख रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे.
याच प्रकरणात नवाब मलिक यांच्याविरोधात कोर्टानं अजामीनपात्र वॉरंट जारी केलं होतं. मात्र मलिक यांनी स्वतः कोर्टात हजेरी लावल्यानं, त्यांनी सादर केलेला नियमित जामीन अर्ज मंजूर करत कोर्टाकडून त्यांचे वॉरंट रद्द करण्यात आले आहे.
काय होते प्रकरण?
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी आपली बदनामी केल्याचा आरोप करत, भाजप नेते मोहित कंबोज यांनी 2021 साली मलिक यांच्याविरोधात फौजदारी मानहानीचा खटला दाखल केला होता. या खटल्याच्या सुनावणीसाठी मोहित कंबोज यांची कोर्टात आग्रही भूमिका होती. दरम्यान आता या प्रकरणात नवाब मलिक यांना न्यायालयाकडून नियमित जामीन मंजूर करण्यात आला आहे.
