बॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट ‘शोले हा सगळ्यांनीच पाहिला असेल. यामध्ये अभिनेते धमेंद्र यांनी साकारलेले वीरू हे पात्र लहान थोरांपासून सगळ्यांच्या लक्षात आहे. या चित्रपटात वीरू हा हेमा मालिनी म्हणजेच बसंतीच्या प्रेमासाठी टॉवरवर चढला होता. अश्याच एका मजनूचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. हा व्हिडिओ मध्य प्रदेशच्या रतलाममधील आहे. एकतर्फी प्रेमासाठी एक तरूण चक्क मोबाईल टॉवर चढला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालताना दिसत आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये?
या व्हिडिओत मोबाईल टॉवरवर चढणाऱ्या तरुणाचे नाव रमेश असून तो नामली येथील रहिवासी आहे. टॉवर चढल्यानंतर रमेश हा शोले चित्रपटात वीरूने बसंतीच्या मावशीवर जसे आरोप केले होते, तसेच आरोप मुलीच्या नातेवाईकांवर करताना दिसत आहे. “माझे 12 वर्षांपासून एका मुलीवर प्रेम आहे. मला तिच्याशी लग्न करायचे आहे. परंतु, या मुलीचे नातेवाईक लग्नाला विरोध दर्शवत आहेत. मला खोट्या प्रकरणात अडकवून तरुंगात पाठवत आहेत. गेल्या वर्षी गुंडा अभियानात त्यांनी मला तरुंगात टाकले. मुलीचे नातेवाईक मला त्रास देत आहेत. एकतर त्या मुलीने माझ्याशी लग्न करावे किंवा मी आत्महत्या करेन”, असे हा तरुण टॉवरवर उभा राहून बोलताना दिसत आहे.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी त्याला खाली उतरवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र, आपला छळ केला जात असल्याचे सांगत तो खाली उतरण्यास नकार दिला. यानंतर तरुणाच्या आई आणि भावाला त्याच्याशी बोलायला सांगितले. सुमारे अडीच तास पोलीस त्याच्याशी संवाद साधून त्याला खाली उतरवण्याचा प्रयत्न करत होते. यानंतर पोलिसांनी तरुणाला सविस्तर बोलून यावर तोडगा काढण्याचे अश्वासन दिल्यानंतर या तरुणाला खाली उतरवण्यात आले.