नागपूर : नागपुरातील भाजपच्या नेत्या सना खान (Sana Khan Murder) यांच्या हत्याप्रकरणात आता खळबळजनक माहिती समोर आली आहे. नागपुरातील सना खान हत्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. गेल्या महिन्यात पोलिसांना सना खान यांच्याशी मिळताजुळता एक मृतदेह जबलपूरमध्ये आढळून आला होता. या मृतदेहाची डीएनए चाचणीचा अहवाल आता आला असून त्यात निगेटिव्ह रीमार्क देण्यात आलाय. त्यामुळे तो मृतदेह सना खानचा नसल्याचे आता डीएनए रिपोर्टमुळे स्पष्ट झालं आहे.
एक महिना उलटून गेला तरी अद्याप सना खानचा मृतदेह हाती लागलेला नाही. आरोपी अमित शाहूच्या घरातील सोफ्यामध्ये सापडलेले रक्ताचे डाग सापडले होते. जबलपूर येथील सोफ्यावरील रक्ताचे डाग हे सना खान यांचेच असल्याचे डीएनए चाचणीत स्पष्ट झालंय. सना खान यांचा 2 ऑगस्टला आरोपी अमित साहू याने खून केला आणि तिचा मृतदेह हिरण नदी फेकला. त्यानंतर पोलिसांनी चौफेर चाचपणी केली मात्र, अद्याप तिचा मृतदेह मिळालेला नाही.
काय आहे सना खान प्रकरण?
2 ऑगस्टपासून सना खान बेपत्ता होत्या. या प्रकरणी नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मानकापूर पोलीस स्टेशनमध्ये मेहरूनिसा खान यांच्या तक्रारीवरून आरोपी पप्पू साहूविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर याप्रकरणी आरोपी अमित शाहुला नागपूर पोलिसांकडून अटक करण्यात आली. यानंतर त्याची कसून चौकशी केली असता त्याने सना खान यांची हत्या केल्याचे कबूल केले. अमितने पत्नी सना खानची हत्या ही पैशांच्या व्यवहारातून केली असल्याचं समोर येतंय. अमित साहूने पत्नीकडून 50 लाख रुपये इतकी रक्कम पार्टनरशिपसाठी घेतली होती. सनाने हे पैसे परत मागितल्यामुळे त्यांच्यात वाद झाला आणि यातून सना खानची हत्या झाली असल्याचे समोर आले आहे.