नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पाकिस्तान क्रिकेट टीमचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) सध्या आपल्या खेळीच्या जोरावर अनेक विक्रम आपल्या नावावर करत चालला आहे. आशिया कपमध्ये नेपाळविरुद्धच्या सामन्यात बाबरने (Babar Azam) शतक ठोकलं, पण स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात बाबरला मोठा स्कोअर करता आला नाही, तरीही त्याने विराट कोहलीला मागे टाकत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. याचबरोबर त्याने धोनी आणि गांगुलीलादेखील मागे टाकले आहे.
पाकिस्तानचा कर्णधार म्हणून बाबर आझमने वनडेमध्ये 2 हजार रन पूर्ण केल्या आहेत. बांगलादेशविरुद्ध बाबरने 22 बॉलमध्ये 17 रन केले. कर्णधार म्हणून सगळ्यात जलद 2 हजार रन करण्याचा रेकॉर्ड विराट कोहलीच्या नावावर होता. कर्णधार असताना विराटने 36 इनिंगमध्ये 2 हजार रन पूर्ण केल्या होत्या. बाबरने 31 इनिंगमध्येच 2 हजार वनडे रन पूर्ण केल्या आहेत.
या यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स आहे. तर न्यूझीलंडचा केन विलियमसन चौथ्या, ऑस्ट्रेलियाचा मायकल क्लार्क पाचव्या क्रमांकावर आहे. एमएस धोनीने 48 इनिंगमध्ये तर सौरव गांगुलीने 49 इनिंगमध्ये 2 हजार रनचा टप्पा पार केला होता. सध्या बाबर आझमचा हा फॉर्म बघता टीम इंडियाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.