पुणे : पुणे महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील प्रवेशासाठी 10 लाख रुपयांची लाच (Pune Bribe News) घेताना रंगेहाथ पकडलेल्या डीन डॉ. आशिष श्रीनाथ बनगिनवार यांची अखेर पालिका सेवेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. आयुक्त विक्रम कुमार यांनी हा निर्णय घेतला आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात डीन आशिष बनगिनवार कार्यरत होते. वैद्यकीय प्रवेशासाठी बनगिनवार यांनी 16 लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यातील 10 लाखांची लाच घेताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यानंतर मोठा गोंधळ अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय झाला होता. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयात मोठी खळबळ उडाली होती. विद्यार्थी संघटनेने याबाबत संताप व्यक्त केला होता
महापालिकेच्या मालकीचे एखादे वैद्यकीय महाविद्यालय असावे, त्यात गरीब नागरिकांना वैद्यकीय सुविधा मिळाव्यात या हेतूने पालिकेने भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय सुरू केले. तिथे महाविद्यालयाचे डीन म्हणून बनगिनवार यांची निवड करण्यात आली होती. याच ठिकाणी हि घटना उघडकीस आल्याने सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी महापालिकेने दक्षता समितीचे अध्यक्ष महेश पाटील, आरोग्यप्रमुख डॉ. भगवान पवार, सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त सचिन इथापे यांची समिती नेमली होती. समितीच्या अहवालात आशिष बनगिनवार दोषी आढळल्याने त्यांना सेवेतून कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.