Raigad News

Raigad News : फिर्यादीच निघाला खुनी; तपासात समोर आलेली माहिती पाहून पोलिसदेखील झाले शॉक

774 0

रायगड : गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण खूप वाढले आहे. रायगड जिल्ह्यातील (Raigad News) माणगाव तालुक्यात अशीच एक संतापजनक घटना घडली आहे. यामध्ये पतीनेच पत्नीचा खून केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
मृत शारदा गणेश चव्हाण आणि आरोपी गणेश चव्हाण हे नात्याने पती आणि पत्नी आहेत. मृत शारदाचे दुसऱ्या माणसाबरोबर प्रेम संबंध आहेत असा संशय गणेशला होता. 1 सप्टेंबर रोजी 7 वाजताच्या सुमारास मौजे इंदापूर गावच्या हद्दीत आरोपीने संशयाचं भूत डोक्यात भरल्याने रागाच्या भरात पत्नी शारदा चव्हाणला हाता, पायाने आणि काठीने जबर मारहाण केली. त्याने तिच्या हात पाय आणि छातीवर मारहाण केली. इतकेच नव्हे तर सैतान झालेल्या पतीने पत्नीचे डोके रेल्वे सिमेंट स्टोन कॉलम नं.104 वर आपटून तिला ठार मारले. यानंतर त्याने तिला नदी किनारी टाकून दिले.

आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने आपल्यावर आळ येऊ नये म्हणून त्याची पहिली पत्नी शेवंता वाघमारे आणि तिच्या नातेवाईकांनी शारदा चव्हाण हिचा खुन केला असल्याची माहिती फोन करून पोलिसांना दिली. या प्रकरणाचा तपास करत असताना पोलिसांना आरोपी पतीवरच संशय आला. यानंतर पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवत त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा मान्य केला. या गुन्ह्याची नोंद माणगांव पोलिस ठाण्यात करण्यात आली असून संशयित आरोपी गणेश चव्हाण याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास माणगाव तालुका पोलिस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किर्तीकुमार गायकवाड करत आहेत.

Share This News
error: Content is protected !!