हिंगोली : नेहमी आपल्या वादग्रस्त वक्तव्य आणि प्रकरणामुळे चर्चेत राहणारे शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Bangar) यांच्या अडचणीमध्ये आता मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. हातात नंगी तलवार घेऊन सार्वजनिक ठिकाणी फिरवल्याने आमदार बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिंगोलीत आयोजित करण्यात आलेल्या कावड यात्रेदरम्यान आमदार बांगर यांनी ही तलवार हातात घेऊन फिरवल्यामुळे त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeay) यांची हिंगोली जिल्ह्यात सभा झाल्यानंतर शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या वतीने कावड यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेतून आमदार बांगर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. कळमनुरीच्या चिंचाळेश्वर महादेव मंदिराजवळ बांगर समर्थकांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी त्यांना कार्यकर्त्यांनी तलवार भेट दिली.
यानंतर आमदार संतोष बांगर यांनी भेट मिळालेली तलवार म्यानातून बाहेर काढून हातात घेऊन नाचवली. या सर्व घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर आमदार बांगर यांच्याविरोधात कळमनुरी पोलीस ठाण्यामध्ये आर्मस ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच बेकायदेशीररित्या डीजे वाजवल्याप्रकरणी डीजेच्या मालकावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.