अजितदादा… 17 ठिकाणं… 12 तासांत 31 उद्घाटनं ! (व्हिडिओ )

333 0

पुणे- सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून काल शुक्रवारीच अर्थमंत्री अजित पवारांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला मात्र या सगळ्या धावपळीत या मंत्र्याच्या कामाचा उरक काही थांबेना. सोमवारी म्हणजेच 14 मार्चला पुणे महापालिकेची मुदत संपत असून पालिकेचा कारभार प्रशासकाच्या हाती जाणार आहे. त्यामुळं पालिका हद्दीत आपल्या नगरसेवकांनी केलेल्या विविध विकासकामांची उद्घाटनं आणि भूमिपूजनं उरकण्यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजितदादा पवार उद्या रविवारी म्हणजेच 13 मार्च रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत. 12 तासांत 17 ठिकाणी जाऊन डझनभर उद्घाटनं आणि भूमिपूजनं त्यांच्या हस्ते होणार असल्यानं अजितदादांचा हा पुणे दौरा रेकॉर्डब्रेक दौरा ठरणार आहे !

अजितदादा म्हटलं की, लवकर उठून सकाळी सकाळी कामाला लागणं हा त्यांचा नित्यनेम शिवाय एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेआधी हजर राहणारे एकमेव मंत्री म्हणून त्यांची ख्याती तर सर्वश्रुत आहेच पण हा उद्याचा दौरा काहीसा वेगळा आहे. 14 मार्चला पुणे महापालिकेची मुदत संपत असल्यानं पालिका हद्दीत आपल्या नगरसेवकांनी केलेल्या विविध विकासकामांची उद्घाटनं आणि भूमिपूजनं उरकण्यासाठी अजितदादा पुणे दौऱ्यावर येत आहेत. रविवारी सकाळी 7 वाजता सुस गावातील नाला व रस्ता रुंदीकरणाच्या कामांची पाहणी करून ते त्यांच्या दौऱ्याला सुरुवात करतील तर सायंकाळी 7 वाजता खराडी येथे सभा घेऊन आपल्या दौऱ्याचा शेवट करतील. या दौऱ्यादरम्यान अजितदादा सुस, माळवाडी, वारजे, शिवणे, कात्रज, बालाजीनगर, सुखसागर नगर, कोंढवा, कौसर बाग, वानवडी, रामटेकडी कृषीभवन (शिवाजीनगर), ताडीवाला रोड, फुलेनगर-नागपूर चाळ, धानोरी, लोहगाव आणि खराडी अशा 17 ठिकाणी आयोजित कार्यक्रमांना हजर राहणार आहेत. विविध विकासकामांची पाहणी, उद्घाटनं, भूमिपूजनं, शुभारंभ, लोकार्पण सोहळे, सदिच्छा भेटी आणि शेवटी सभा असा हा भरगच्च दौरा आहे. आमदार, नगरसेवक, पुणे महापालिकेचे आजी-माजी विरोधी पक्षनेते, जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सभापती यांनी केलेल्या कामांवर मोहोर उमटण्यासाठी अजितदादा पुण्यात येतायत.

एका दिवसात एवढ्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याचा अजितदादांचा हा खटाटोप कशासाठी या प्रश्नाचं उत्तर शोधायचं म्हटलं तर ‘कामांचा उरक निवडणुकीला पूरक’ असंच म्हणता येईल, बाकी काय ?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!