Poisoning

Poisoning : धक्कादायक ! सांगलीच्या आश्रमशाळेमध्ये जेवणातून 170 मुलांना विषबाधा

1563 0

सांगली : सांगलीच्या जत तालुक्यातल्या उमदी येथील आश्रम शाळेतील मुलांना विषबाधा (Poisoning) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सुमारे 170 हून अधिक मुलांना जेवणातून विषबाधा झाली आहे. या घटनेमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. विषबाधा झालेल्या सर्व मुलांना माडग्याळ इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर काही विद्यार्थ्यांचे प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

काय घडले नेमके?
आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना रात्री देण्यात आलेल्या जेवणातून ही विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. जेवणानंतर मुलांना अचानकपणे एकाच वेळी उलटी, मळमळ आणि जुलाब सुरू झाले होते. त्यानंतर मुलांची प्रकृती बिघडत असल्याने त्यांना तातडीने माडगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. विषबाधा झालेल्यांच्या मध्ये पाच ते पंधरा वर्षांपासून मुलांचा आणि मुलींचा समावेश आहे.सध्या सर्व मुलांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर माडग्याळ, जत आणि मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आश्रम शाळा संस्थापकाच्या घरी झालेल्या डोहाळे कार्यक्रमानिमित्ताने बनवण्यात आलेल्या बासुंदी मधून विषबाधा झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. गावात डोहाळे कार्यक्रम निमित्ताने करण्यात आलेले शिल्लक जेवण आश्रम शाळेतील मुलांना देण्यात आले होते. गावातील इतर लोकांना देखील जेवणानंतर विषबाधा होऊन त्रास झाल्याचे समोर आले आहे. या घटनेची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी माडग्याळ, जत व मिरज तिन्ही ठिकाणी डॉक्टरांना तात्काळ व सर्वोत्तम उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Share This News
error: Content is protected !!