बीड : बीड (Beed Accident) जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील मानूरजवळ झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला, तर 6 जण जखमी झाले आहेत. मोहटादेवीच्या दर्शनासाठी जाताना हा भीषण अपघात झाला. हा अपघात काल सकाळी 11 वाजताच्या सुमारास घडली होती. या अपघाताची माहिती मिळताच नागरिकांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले.
काय घडले नेमके?
बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असलेल्या तागडगाव येथील नाईकनवरे कुटुंबातील सर्व जण हे नगरमधील मोहटादेवीच्या दर्शनासाठी जात होते. यावेळी भरधाव वेगात असलेल्या गाडीवरील चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे गाडीने दोन ते तीन पलट्या घेतल्या. यामध्ये गाडीचा अक्षरशा चेंदामेंदा झाला. या अपघाताचा मोठा आवाज झाला.
हा आवाज ऐकून नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. यावेळी गाडीमध्ये सात-आठ जण होते. त्यातील गोकुळ बापूसाहेब नाईकनवरे (वय वर्ष 40) आणि दिव्या अजिनाथ मडके (वय वर्ष 8 महिने) यांचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. मोहटा देवीच्या दर्शनाला जात असताना हा अपघात झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. वेगात असलेल्या गाडीवरुन चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला.