नाशिक : नाशिक (Nashik Crime) जिल्ह्यातील येवला तालुक्यातील मुखेड या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये (Nashik Crime) प्रतीक सुदाम आहेर या तरुणाची प्रेम प्रकरणातून हत्या करण्यात आली आहे. येवला तालुका पोलिसांनी या प्रकरणी चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.
काय घडले नेमके?
येवला तालुक्यातील मुखेड येथील प्रतीक सुदाम आहेर याचे गावातीलच एका तरुणी बरोबर प्रेम संबंध होते. याचा राग तिच्या कुटुंबियांना होता. यातूनच प्रतीकला निर्जन स्थळी बोलावून त्याला जबर मारहाण करण्यात आली. या मारहाणीनंतर गंभीर जखमी झालेल्या प्रतीकला नाशिक येथे अधिक उपचारासाठी हलवण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी येवला तालुका पोलिसांनी वसंत केशव जाधव, संदीप वसंत जाधव, सुनील वसंत जाधव व निखिल संदीप जाधव या संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. या घटनेची माहिती मिळताच मनमाड पोलीस उपविभागीय अधिकारी सोहेल शेख, येवला तालुका प्रभारी पोलीस निरीक्षक तथा प्रशिक्षणार्थी पोलीस उपविभागीय अधिकारी विशाल क्षीरसागर, सहाय्यक पोलीस निरीक्षक बहीर शिंदे यांच्यासह पोलीस हवालदार माधव सानप, पोलीस कॉन्स्टेबल आबा पिसाळ यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्या ठिकणची पाहणी केली. या प्रकरणी संशयित आरोपींच्या विरोधात येवला तालुका पोलीस ठाण्यात मारहाण व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे गावात मोठी खळबळ उडाली आहे.