पुणे : बिबट्या या वन्य प्राण्याची शिकार (Leopard Hunting) करुन त्याचे अवयव खडकवासला धरणालगत मांडवी बुद्रुक येथील फार्महाऊस मध्ये (Leopard Hunting) लपवून ठेवल्याची घटना समोर आली आहे. या ठिकाणी वन विभागाने छापा टाकून नख्यांसह पंजा जप्त केला आहे. याप्रकरणी विश्वजीत जाधव व अभिजित जाधव यांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 व भारतीय वन अधिनियम 1927 मधील विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर हे दोन्ही आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध सुरु आहे.
खडकवासला धरणाला लागून असलेल्या मांडवी खुर्द या गावच्या हद्दीतील शेट्टी फार्महाऊसमध्ये बिबट्याची शिकार करुन संबधितांनी अवयव लपवून ठेवले असल्याची माहिती पुण्यातील एका प्रसिद्ध हॉटेल चालकाच्या मुलीने वन विभागाला दिली. या घटनेची माहिती मिळताच उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक दिपक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ, डोणजे वनपरिमंडळ अधिकारी सचिन सपकाळ व इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने संबंधित फार्महाऊसवर छापा टाकला.
या छाप्यात फार्महाऊसमधील कपाटात एका कापडामध्ये बिबट सदृष प्राण्याचा नख्यांसह पंजा लपवून ठेवलेला असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आढळून आले. परिसरात इतर ठिकाणी पाहणी करण्यात आली. मात्र वन विभागाच्या अधिकाऱ्यांना आणखी अवयव सापडले नाहीत. भांबुर्डा वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.