खेळ

Asia Cup 2023 : आशिया कपसाठी टीम इंडियाची घोषणा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आशिया कप 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत (Asia Cup 2023) एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत. या 6 संघांमध्ये टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. आशिया कपसाठी पाकिस्तान, श्रीलंका आणि नेपाळने याअगोदरच आपला संघ जाहीर केला आहे. यानंतर आता आज टीम इंडियाने आपला संघ जाहीर केला आहे. बीसीसीआय निवड समितीने 17 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघ आशिया कप स्पर्धेत उतरणार आहे.

केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांना संघात स्थान मिळाले आहे. दोन्ही खेळाडू अजूनही दुखापतीतून सावरत आहेत. तिलक वर्मा प्रथमच एकदिवसीय संघात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. रोहित शर्माशिवाय शुभमन गिल, विराट कोहली, तिलक वर्मा, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांना आशिया कपसाठी निवडण्यात आलेल्या संघात स्थान मिळाले आहे. इशान किशन आणि केएल राहुल यांचा यष्टिरक्षक म्हणून समावेश करण्यात आला आहे. तर अष्टपैलू खेळाडू म्हणून हार्दिक पांड्या, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांना संघात स्थान दिले आहे. कुलदीप यादव याचा फिरकीपटू म्हणून तर वेगवान गोलंदाज म्हणून जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, प्रसिद्ध कृष्णा आणि मोहम्मद सिराज यांची आशिया कपसाठी संघात निवड करण्यात आली आहे.

आशिया कपसाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, हार्दिक पांड्या, विराट कोहली, केएल राहुल (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, इशान किशन (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, सूर्यकुमार यादव , टिळक वर्मा , प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन (राखीव).