प्रत्येक भारतीयासाठी 15 ऑगस्ट रोजी साजरा होणारा स्वातंत्र्यदिन आणि 26 जानेवारी रोजी साजरा होणारा प्रजासत्ताक दिन हे महत्वाचे दिवस आहेत. आणि विशेष म्हणजे भारत हा जगातील एकमेव देश आहे जो दोन राष्ट्रीय सण साजरे करतो. दोन्ही दिवशी ध्वज फडकवला जातो. पण दोन्ही दिवस साजरे करण्याची पध्दत आणि नियम वेगळे आहेत. ते काय आहेत पाहूयात…
आपला तिरंगा म्हणजे देशाची शान आहे. दरवर्षी 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला तिरंगा फडकवला जातो. 15 ऑगस्टला म्हणजे स्वातंत्र्यदिनी, राष्ट्रध्वज खालून वर खेचला जातो आणि नंतर फडकवला जातो. याला ध्वजारोहण म्हणतात. तर 26 जानेवारी 1950 ला भारताचा झेंडा होताच; पण स्वातंत्र्यानंतरही स्वतःची राज्यघटना अस्तित्वात येईपर्यंत अडीच वर्षे इंग्रजांच्या कायद्यानेच राज्य चालले. याचे प्रतीक म्हणून झेंडा बंद घडीत बांधून वर नेउन दोरी ओढून वरच्या वर गाठ सोडून झेंडा हवेत मोकळा करून ध्वज फडकवला जातो, याला ध्वज फडकावण किंवा ध्वजांकित करणं अस म्हणतात. या दिवशी ध्वजारोहण म्हणत नाहीत. परंतु सर्वसाधारणपणे अनेकदा ध्वजारोहण शब्दप्रयोग केला जातो जो चुकीचा आहे.
15 ऑगस्ट 1947 रोजी भारत देश इंग्रजांच्या जोखडातून स्वतंत्र झाला. तर 26 जानेवारी 1950 रोजी देशात राज्यघटना स्थापन झाली. म्हणजे आपला देश प्रजासत्ताक (प्रजेची सत्ता) असलेला देश झाला. या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमात काय फरक आहे पाहूयात …
15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान जे केंद्र सरकारचे प्रमुख आहेत ते ध्वजारोहण करतात. स्वातंत्र्य दिनानिमित्त मुख्य कार्यक्रम हा लाल किल्ल्यावर आयोजित करण्यात येतो. यावेळी पंतप्रधान लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून देशाला संबोधित करतात. तर 26 जानेवारी रोजी आयोजित मुख्य कार्यक्रमात राष्ट्रपती जे राष्ट्राचे घटनात्मक प्रमुख आहेत ते ध्वज फडकवतात. आणि प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम हा राष्ट्रपती भवनासमोर राजपथावर होतो. 15 ऑगस्टच्या दिवशी कार्यक्रमाला बाहेरच्या देशातून कोणी प्रमुख पाहुणे बोलावले जात नाही तर 26 जानेवारीला बाहेरच्या देशातील सन्माननीय नेत्यांना आमंत्रित केलं जातं.